आज अखेरच्या दिवशी उडणार झुंबड
By admin | Published: February 6, 2017 01:10 AM2017-02-06T01:10:35+5:302017-02-06T01:10:35+5:30
‘ए बी’ फॉर्म भरणे आवश्यक
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस असून, दुपारी तीनपर्यंत जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अक्षरश: झुंबड उडणार आहे, तसेच पक्षाच्या उमेदवारांना ‘ए बी’ फॉर्म भरण्यासाठीची मुदत आजच संपत आहे. दरम्यान, रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ४३७ उमेदवारांनी ५२१ अर्ज दाखल केले.
जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी दि. २१ फेबु्रवारीला मतदान होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आज, सोमवारी संपते. रविवारी जिल्हाभर अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. सोमवारी शेवटच्या दिवशी गडबड नको म्हणून अनेकांनी रविवारी अर्ज दाखल केले आहेत.
रविवारअखेर जिल्हा परिषदेसाठी ३९१ तर पंचायत समितीसाठी ५५८ अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी दुपारी ३ पर्यंत मुदत असल्याने सकाळी १० पासूनच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते तालुक्याच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.
ए बी फॉर्मसाठीही शेवटची मुदत
पक्षाच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म दाखल करण्याची आजची शेवटची मुदत आहे. १ फेब्रुवारीपासून अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पक्षाने ए बी फॉर्म दिलेले नाहीत अशांची संख्या मोठी आहे. अशांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म भरणे बंधनकारक आहे तसा फॉर्म न भरल्यास संबंधित उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरू शकणार नाही.
आवारात असतील त्यांचे अर्ज घेतले जाणार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज, सोमवारी शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होणार असल्याने प्रशासनावरही ताण येणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रविवारीच अनेक ठिकाणी तीन वाजून गेले तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. बहुतांशी पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असल्याने आज, सोमवारी सर्वजण अर्ज भरण्यासाठी गर्दी करणार आहेत. दुपारी तीननंतरही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र, दुपारी तीनच्या आधी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत आवारात असणाऱ्या इच्छुकांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर जे अर्ज भरून घेण्याच्या कार्यालयाच्या आवारात असतील अशांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. गर्दी आहे म्हणून संध्याकाळी पाच वाजता कोणी अर्ज दाखल करायला आला तर अर्ज घेतले जाणार नाहीत. जाहीर सूचना दिल्यानंतर जे आवारात असतील त्याच इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत.
एकमेकांच्या यादींवर लक्ष
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या उमेदवारांची माहिती घेण्यातच अनेक नेत्यांचा वेळ गेला. एकमेकांची नावे कळू नयेत यासाठी अनेकांनी उर्वरित उमेदवारांच्या नावांच्या याद्याही रविवारी जाहीर केल्या नाहीत. सर्वांत प्रथम ‘भाजता’ने आपली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही दोन याद्या जाहीर केल्या होत्या. यानंतर तिसरी २० उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र तीही आता आज, सोमवारी सकाळी ११ वाजता जाहीर (पान १० वर)