शेतकऱ्यांसाठी आजपासून पाच रुपयांत जेवण
By admin | Published: May 1, 2017 12:12 AM2017-05-01T00:12:23+5:302017-05-01T00:12:23+5:30
सांगली बाजार समितीचा उपक्रम : पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेस प्रारंभ होणार
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बीडच्या धर्तीवर अवघ्या पाच रुपयांत शेतकऱ्यांना जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते होत आहे. जिल्ह्यासह परराज्यातून मार्केट यार्डात येणाऱ्या दररोज पाचशेवर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम आहेत. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, जयश्रीताई मदन पाटील, विशाल पाटील, दिनकरतात्या पाटील, संभाजी पवार, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पणनचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे उपस्थित राहणार आहेत.
सांगलीची हळद, गूळ आणि बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. मार्केट यार्डात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह परराज्यातील शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी येतात. दररोज किमान पाचशे शेतकरी मार्केट यार्डात येत असतात. याशिवाय हंगामात त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची सांगलीत जेवणाची गैरसोय होत असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजार समिती आणि अडते यांच्याकडून जेवणासाठी येणारा हा खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जेवणासाठी तीस रुपये खर्च येत असला तरी, त्यांच्याकडून अवघे पाच रुपयेच घेतले जाणार आहे.
उर्वरित रक्कम सांगली बाजार समितीकडून खर्च केली जाईल. सध्या काही शेतकऱ्यांना व्यापारी जेवण देतात, मात्र अनेक शेतकऱ्यांचे जेवणासाठी हाल होत असल्याचेही दिसून आले आहे. शेतकऱ्यांना जेवण देण्याच्या निर्णयास सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाने सहमती दर्शविली. आता हा उपक्रम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
बीड बाजार समितीच्या धर्तीवर प्रयोग
बीड कृषी बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. त्याच धर्तीवर सांगली बाजार समितीने धाडसी निर्णय घेतला आहे. जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी, भात असा मेनू राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवणाअभावी हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.