उद्योजकांचा आज अर्धा दिवस बंद
By admin | Published: March 11, 2016 12:08 AM2016-03-11T00:08:10+5:302016-03-11T00:09:56+5:30
सराफ बंदला पाठिंबा : गायकवाड, ओसवाल यांची माहिती
कोल्हापूर : अबकारी कराला विरोध करण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे गेले दोन आठवडे आंदोलन सुरू केले आहे. त्यानिमित्त आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील व्यापारी, उद्योजक, दुकानदार, आदी व्यावसायिक आपले सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवून सहभागी होणार असल्याची माहिती सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड व जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली. दरम्यान, खासदार, मंत्री, आमदार यांना पदाधिकारी भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
आज सकाळी १० वाजता श्री अंबाबाई मंदिर येथे श्रीफळ वाढवून मोर्चाला प्रारंभ होत आहे. यावेळी माणिक जैन, राजेश राठोड, बाबा महाडिक, स्वप्निल शहा, विजयकुमार भोसले, मनोज राठोड, आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, दैवज्ञ बोर्डिंग, बंगाली कारागीर, टंच असोसिएशन, सोने-चांदी मणी कारागीर संघटना, चांदी मूर्ती कारागीर असोसिएशन, चांदी कारखानदार असोसिएशन, पास्टा संघटना, पॉलिश संघटना, पांचाल सोनार आणि दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघ, मनसे, अंगडिया सर्व्हिस अशा संस्था, संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
प्रश्न केंद्रात मांडू : सतेज पाटील
दरम्यान, गुजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अबकारी कराचा प्रश्न केंद्रात मांडू, असे आश्वासन सराफ व्यावसायिकांना दिले. आमदार पाटील म्हणाले, या ‘बंद’चा अधिक तोटा ग्राहकालाच होत आहे. बंद पाळून आम्ही कराला विरोध करीत आहोत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.
मोर्चात सहभागाचे चेंबर आॅफ कॉमर्सचे आवाहन
अबकारी कर व पॅनकार्ड सक्तीच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. रूपांतरित कराच्या नोटिसा, त्यासाठी जप्तीची टांगती तलवार, प्रस्तावित घरफाळा वाढ, २० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव यामुळे सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांची एकजूट आवश्यक बनल्याने सराफ व्यावसायिकांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज, शुक्रवारी होणाऱ्या मोर्चात इतर सर्व व्यावसायिकांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने सर्व संलग्न व्यापारी, औद्योगिक संघटना व त्यांच्या सदस्यांना करण्यात येत असल्याचे आवाहन अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष संजय शेटे, सुरेंद्र जैन यांनी केले आहे.