टोलविरोधात आज कऱ्हाडात धरणे आंदोलन
By admin | Published: June 26, 2014 12:39 AM2014-06-26T00:39:23+5:302014-06-26T00:42:40+5:30
तयारी पूर्ण : मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सर्वपक्षीय कृती समितीचे आवाहन
कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे उद्या, गुरुवारी कऱ्हाड येथे टोल रद्दच्या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी नऊ वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलक कऱ्हाडकडे रॅलीने रवाना होणार आहेत. सर्व वाहनधारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केले आहे.
कोल्हापुरातील टोल प्रश्नाकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधण्यासाठी कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. सातारा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता कमी रुंदीचा आहे, तसेच समोरच एक मोठे हॉस्पिटल आहे, यामुळे मार्केट यार्ड येथे आंदोलन करण्याची विनंती आंदोलकांना केली. ती विनंती मान्य करून मुख्यमंत्र्यांच्या घराऐवजी मार्के ट कमिटी येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या तयारीसाठी सर्व शिक्षण संस्था, वाहतूक संघटना, विविध राजकीय पक्ष यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधलेला आहे. वाहनांसह कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता दसरा चौक येथे जमण्याचे ठरले आहे. कराडपर्यंत जाणारी ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणावरही वैयक्तिक किंवा पक्षीय टीका केली जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.
कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी ही रॅली अन् आंदोलन करूया, असे आवाहन साळोखे यांनी केले आहे. आंदोलनात कोल्हापूर बार असोसिएशन, लॉरी असोसिएशन टेम्पो व आॅटो रिक्षा युनियन, खासगी बस असोसिएशन आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)