वाशीच्या जळ यात्रेचा आज मुख्य दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:49+5:302021-03-16T04:24:49+5:30
सडोली (खालसा) : महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गोवा या राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या वाशी येथील श्री बिरदेव त्रैवार्षिक जळ ...
सडोली (खालसा) : महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गोवा या राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या वाशी येथील श्री बिरदेव त्रैवार्षिक जळ यात्रेस सोमवारी प्रारंभ झाला. मोजक्याच मानकरी, पुजारी यांच्या उपस्थितीत ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं...’च्या व धनगरी ढोलांच्या गजरात, शासकीय नियमांत पहिला पालखी सोहळा झाला. आज मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून दुसरी पालखी आहे.
कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका असल्याने या यात्रेवर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध लावले असून पोलिसांच्या बंदोबस्तात शासकीय नियमांचे पालन करून यात्रा सुरू आहे. भाविकांना वाशी गावात येण्यास मनाई घातली असून गावात कुठेही बकरे कापण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रविवारी रात्री बिरोबाच्या नावानं चांगभलं...च्या गजरात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत गावकामगार तलाठी मुरली पाटील व उदयानी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे सरकार यांनी पालखी पूजन केल्यावर मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराकडे पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी पहाटे ४ वाजता मुख्य मंदिराजवळ पोहोचल्यानंतर. मांडीवरील मानाचे भरंगुडेचे बकरे मांडीवर बळी देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आप्पासाो पुजारी यांची भाकणूक पार पडली व उत्सवमूर्तीची मुख्य मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुडशिंगीचे गणपती पुजारी व वाशीचे भागोजी रानगे यांनी भाकणूक केली. रात्री धनगरी ओव्या गायन व ढोलवादनाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यात्रेसाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरपंच गीता लोहार, उपसरपंच संगीता पाटील, उदयानी साळुंखे, बबन रानगे, अरुण मोरे, इंद्रजित पाटील, संदीप पाटील, ग्रामसेवक टी. जी. अत्तार, तलाठी एकनाथ शिंदे, विनायक उलपे यांच्यासह ट्रस्टचे सर्व सह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळ
वाशी ता. करवीर येथील बिरदेव जळ यात्रेस प्रारंभ करण्यात आला. उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
फोटो दिव्या फोटो गाडेगोंडवाडी