आजपासून नवरात्रौत्सव
By admin | Published: October 1, 2016 01:09 AM2016-10-01T01:09:18+5:302016-10-01T01:11:52+5:30
आज सकाळी साडेआठ वाजता मानकरी श्रीपूजकांच्या हस्ते अंबाबाईची घटस्थापना होईल. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा पहिला शासकीय अभिषेक होईल.
कोल्हापूर : दुष्टांचा संहार आणि सज्जनांचा उद्धार करणाऱ्या आदिशक्तीच्या आराधनेच्या नवरात्रौत्सवाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. दुर्गेच्या या उत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले असून, शहरात उत्साहाला उधाण आले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातही उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले आहे.
आज, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. दरम्यान, दहशतवादी कारवाया आणि भारताने त्यांना दिलेल्या चोख प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अंबाबाई मंदिराला अत्यंत कडक आणि चोख सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
आज सकाळी साडेआठ वाजता मानकरी श्रीपूजकांच्या हस्ते अंबाबाईची घटस्थापना होईल. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष
डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा पहिला शासकीय अभिषेक होईल.
दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सिंहासनाधिष्ठित सालंकृत बैठी पूजा बांधण्यात येईल. उत्सवकाळात देशभरातून २५ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यंदा प्रथमच देवस्थान समिती आणि (पान १४ वर) महापालिकेने पुढाकार घेऊन भाविकांसाठी अधिकाधिक सोयी-सुविधा पुरवल्या आहेत.
मंदिर उजळले...
यंदा नवरात्रौत्सवात प्रथमच अंबाबाई मंदिराला विविध रंगांच्या विद्युतमाळांची आकर्षक रोषणाई केली आहे. गुरुवारी (दि. २९) या रोषणाईची चाचणी घेण्यात आली. शुक्रवारपासून ही रोषणाई सुरू करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीच्या रोषणाईने मंदिर परिसर विविध रंगांनी रंगून गेला आहे.
त्र्यंबोली यात्रा ६ तारखेला
यंदा ललितापंचमी बुधवारी व गुरुवारी अशी दोन दिवस आहे. मात्र, ज्या दिवशी सहा घटिकांपेक्षा अधिक काळ ललितापंचमी असते, त्या दिवशी त्र्यंबोली यात्रा साजरी केली जाते. यंदा गुरुवारी म्हणजे ६ आॅक्टोबरला त्र्यंबोली यात्रा होणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत अंबाबाईचे धार्मिक विधी केले जातील. १० वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघेल. दुपारी १२ वाजता कोहळा छेदन विधी होणार आहे.
अष्टमीचा जागर
यंदा अष्टमी रविवारी (दि. ९ आॅक्टोबर) आहे. या दिवशी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाई फुलांनी सजविलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणेला निघेल. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरात भेटीवेळी मानाचे विडे देण्याचा कार्यक्रम होईल. नगरप्रदक्षिणेनंतर पहाटे चार वाजेपर्यंत देवीचा जागर होईल. सोमवारी (दि. १०) खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन होईल. मंगळवारी (दि. ११) अंबाबाईची रथारूढ सालंकृत पूजा बांधली जाईल. सायंकाळी पाच वाजता देवीची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सीमोल्लंघनाला जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक होईल.
हिरकणी कक्ष आणि लॉकर्सची सोय
यंदा प्रथमच स्तनदा मातांचा विचार करून देवस्थान समितीतर्फे ‘हिरकणी कक्ष’ स्थापन केला आहे. मंदिर परिसरातील आयसीआयसीआय बँकेशेजारी या कक्षाची सोय असेल. याशिवाय परस्थ भाविकांच्या बॅगा ठेवण्यासाठी शेतकरी बझार परिसरात लॉकर्सची सोय केली आह. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव दोन सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.
वाढीव मंडप, पिण्याचे पाणी, अन्नछत्राची सोय
यंदा नवरात्रौत्सव काळात पाच दिवस सुट्या आल्या आहेत. पाऊसही चांगला पडल्याने सुबत्ता आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून देवस्थान समितीतर्फे दर्शनरांगांसाठी वाढीव मंडप उभारला आहे. मंदिरासह बाहय परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय आहे. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे रोज किमान सात ते आठ हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
पार्किंग आणि स्वच्छतागृह
भाविकांच्या वाहनांसाठी शिवाजी स्टेडियम, प्रायव्हेट हायस्कूल, एम. एल. जी. हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल, दसरा चौक मैदान, सिद्धार्थनगर कमानीमागील मैदान, पंचगंगा घाट, गांधी मैदान, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी, बिंदू चौक, मैलखड्डा, सुसरबाग येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर पुरुषांसाठी पाच व महिलांसाठी सात स्वच्छतागृहे तसेच अंघोळीसाठी प्रसाधनगृह, बिंदू चौक पार्किंगच्या ठिकाणी १२ स्वच्छतागृहे, पंचगंगा नदीघाट, सरस्वती टॉकीज पार्किंग, बाबूजमाल, कपिलतीर्थ मार्केट, कॉमर्स कॉलेज या सर्व ठिकाणी पालिकेतर्फे स्वच्छतागृहेउभारली आहेत. दहा स्वच्छतागृहे असलेली दोन फिरती शौचालयेही उपलब्ध आहेत.