अर्ज भरण्यासाठी आज झुंबड
By admin | Published: October 27, 2016 12:33 AM2016-10-27T00:33:10+5:302016-10-27T00:39:50+5:30
-कोल्हापूर नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी १, तर नगरसेवकपदासाठी ११ अर्ज दाखल
कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अर्ज भरण्याला संथ प्रतिसाद दिसत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस शनिवार (दि. २९)पर्यंत असला तरी दिवाळीचा सण असल्याने खऱ्या अर्थाने आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. बुधवारी नगराध्यक्षपदासाठी कागलमधून १ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी कागलमधून १० व मुरगूडमधून १ अर्ज दाखल करण्यात आला.
नऊ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी (दि. २४) सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही नगरपालिकेतून नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारीही नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी नगरसेवकपदासाठी जयसिंगपूर नगरपालिकेत १ व कागल नगरपालिकेत ३ असे ४ अर्ज दाखल झाले.
बुधवारी नगराध्यक्षपदासाठी कागल येथून १ अर्ज दाखल झाला, तर नगरसेवकपदासाठी कागल येथून १० व मूरगूड येथून १ अर्ज दाखल झाला. गेल्या दोन दिवसांपासून ही प्रक्रिया सुरू असली तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही. (प्रतिनिधी)
शनिवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस
जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेत एकही अर्ज दाखल झालेला नाही. शनिवारी (दि. २९) उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. याच दिवशी दिवाळी सणाचा मुख्य दिवस असल्याने
उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे.