कडेगावात आज ताबुतांच्या भेटी
By admin | Published: November 3, 2014 11:17 PM2014-11-03T23:17:54+5:302014-11-03T23:28:36+5:30
उभारणी पूर्ण : अंबील मिरवणूक उत्साहात; गुरुवारी कुस्ती मैदान
रजाअली पीरजादे - शाळगाव -कडेगाव येथील उंच ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून उद्या (मंगळवारी) ताबुतांच्या भेटी होणार आहेत. मोहरमनिमित्त कडेगावात कालपासून यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रीय एकात्मता आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहरम सणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शिवाजी चौकात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
आज पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने फातेहा होऊन ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली. मोहरमनिमित्त एकूण १४ ताबूत-पंजे बसविले जातात. ताबुतांचे बांधकाम एक महिना अगोदर सुरू होते. आज सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यापासून अंबीलची मिरवणूक काढण्यात आली. ती पिरजादे वाड्यातून मसुदमाला बारा इमाम येथे नेण्यात आली. कत्तलरात्र असल्याने मानाच्या सातभाई ताबुताजवळ आणि मसुदमाला येथे लोकांनी गर्दी केली होती.
गावात जय्यत तयारी
गुरुवारी सकाळी जियारतीचा कार्यक्रम. दुपारी चारला पाटील चौकात जंगी कुस्त्यांचे मैदान होईल.
कडेगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ११ अधिकाऱ्यांसह १४० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
सर्व तयारी पूर्ण : सरपंच विजय शिंदे, उपसरपंच अविनाश जाधव
कत्तलरात्रीनिमित्त ताबुतांच्या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी. रात्री खास गोरख सोंगाचा सामना पार पडला.
काही परदेशी पर्यटक दाखल
जादा एसटी गाड्यांची सोय
असे असतील उत्सवाचे कार्यक्रम
उद्या, मंगळवार, दि. ४ रोजी भेटीचा महत्त्वाचा सोहळा पार पडणार आहे. सकाळी दहाला पूजा होऊन मानाचा पहिला सातभाई यांचा ताबूत उचलण्यात येईल.
त्यानंतर भाऊसाहेब देशपांडे, हकीम, आतार, बागवान यांचे मानाप्रमाणे ताबूत उचलण्यात येतील. हे सर्व ताबूत पाटील चौकात सकाळी अकरापर्यंत येतील.
पाटील चौकातून हे सर्व ताबूत वाजत-गाजत ओळीने भेटीच्या ठिकाणी मोहरम चौकात एकत्र येतील. तेथे ‘महान भारत देश आमुचा, घुमवू जय जयकार’ आणि ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा’ अशा प्रकारची राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हटली जातील. सर्व मेलवाले व करबलवाले राष्ट्रीय एकात्मतेची आणि मोहरमची गाणी गातील.
त्यानंतर सुतार, इनामदार यांचे मोठे ताबूत आणले जातील. शेवटी मानकऱ्यामार्फत मसुदमाला ताबूत पंजे, बारा इमाम पंजे आणले जातील.
दुपारी एक वाजता ताबुतांच्या अधिकृत भेटींना सुरुवात होईल. मानाप्रमाणे भेटी होऊन सर्व ताबूत-पंजे मिरवणुकीने आपापल्या जागी रवाना होतील.
ताबुतांच्या भेटीचा सोहळा दुपारी दोनपर्यंत पूर्ण होईल. मोहरमनिमित्त गुरुवारी कुस्त्यांचे मैदान आणि जियारत होणार आहे.