करवीरनगरीचा आज शाही दसरा
By admin | Published: October 22, 2015 12:38 AM2015-10-22T00:38:38+5:302015-10-22T00:51:00+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी या दोन्ही देवतांची स्वतंत्र शस्त्रगृहे आहेत.
कोल्हापूर : अश्विन शुद्घ प्रतिपदेला घटस्थापनेपासून सुरू झालेला शारदीय नवरात्रौत्सवाचा अंतिम टप्पा अर्थात खंडेनवमी आणि सीमोल्लंघनाचा सोहळा. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी या दोन्ही देवतांची स्वतंत्र शस्त्रगृहे आहेत. खंडेनवमीनिमित्त या देवतांच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. दसरा चौक येथील सीमोल्लंघनाच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. खंडेनवमीला शस्त्रांची किंवा घरातील धारदार साहित्यांची पूजा केली जाते. राक्षसाचा वध या महाअष्टमीच्या मुख्य दिवसानंतर आज, गुरुवारी खंडेनवमी साजरी होत आहे. यानिमित्त तुळजाभवानीच्या शस्त्रांची पूजा होईल. आज सकाळी देवीच्या पूजेनंतर साडेदहाला हा विधी होईल. यासह घरा-घरांतील लहान-मोठ्या शस्त्रांचे पूजन केले जाते. ‘विजयादशमी’ म्हणजे देवीचा विजयोत्सवाचा दिवस. सायंकाळी पाच वाजता अंबाबाई, तुळजाभवानी व गुरूमहाराजांची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकात पोहोचेल. येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज श्रीमंत संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, श्रीमंत यशस्विनीराजे, श्रीमंत राजकुमार यशराजराजे यांच्या हस्ते शमीचे पूजन होईल. आरती आणि बंदुकीच्या फैरी झाडून देवीला मानवंदना दिली जाईल. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी सहानंतर पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला लागेल. अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरमार्गे नगरवासीयांना भेटी देत रात्री आठ वाजता गरुड मंडपात येईल. रात्री साडेनऊला देवीची पुन्हा पालखी काढली जाईल.
६ वाजून २ मिनिटांनी होणार शमीपूजन
नवीन राजवाड्यातून छत्रपती कुटुंबीय सायंकाळी
५ वाजून ४३ मिनिटांनी ऐतिहासिक दसरा चौकाकडे येण्यासाठी शाही मैबॅक गाडीतून निघणार आहेत. ५:५८ ते ६:०४ या दरम्यान, हे शाही शमीपूजन होणार आहे.
त्यानंतर भवानी मंडपातील जुन्या राजवाड्यात छत्रपतींचा दसऱ्याचा दरबार भरणार आहे. यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते संस्थान शिवसागर या संस्थान समाधींकडे जाणार आहेत.