त्र्यंबोली देवीची आज यात्रा
By admin | Published: September 29, 2014 01:03 AM2014-09-29T01:03:58+5:302014-09-29T01:09:06+5:30
ललित पंचमीनिमित्त अंबाबाई आणि देवी त्र्यंबोलीची भेट
कोल्हापूर : ललित पंचमीनिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि देवी त्र्यंबोली या दोन सखींची भेट घडविणारी त्र्यंबोली देवीची यात्रा उद्या, सोमवारी होणार आहे. यानिमित्त अंबाबाईच्या नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि दहा वाजता देवीचा अभिषेक होईल. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान झालेली पालखी मंदिरातून, तुळजाभवानी देवीची व गुरू महाराजांची पालखी भवानी मंडप येथून त्र्यंबोलीकडे प्रस्थान करील. दुपारी ठीक बारा वाजता अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवी या दोन्ही सखींची भेट होईल. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज अथवा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते दुपारी साडेबाराला कोहळा फोडण्याचा मान असलेल्या कुमारीचे पूजन होईल व कोहळा फोडण्याचा विधी होईल. येथील धार्मिक विधी संपल्यानंतर पालख्या पुन्हा परतीसाठी मार्गस्थ: होतील. बिंदू चौक कमानीतून प्रवेश करत अंबाबाईची पालखी संत गाडगे महाराज चौकातून घाटी दरवाजामार्गे पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. रात्री नेहमीप्रमाणे पालखी निघेल.
वाहतूक मार्गात बदल
त्र्यंबोलीदेवी मंदिराकडे टेलिफोन टॉवरकडून जाणारा मार्ग हा टेलिफोन टॉवर ते त्र्यंबोली देवी मंदिर गेट व पुढे टीए बटालियन अधिकारी निवासस्थानमार्गे विक्रमनगर पाण्याच्या टाकीपर्यंत जातो. या तिन्ही बाजंूनी ये-जा करणाऱ्या सर्व मोटार वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
तसेच सर्व अवजड वाहनांची वाहतूक ही टाकाळा चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेल मार्गावरून मार्गस्थ होईल.