वटपौर्णिमा आज, उद्या कर्नाटकी बेंदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:09+5:302021-06-24T04:17:09+5:30
कोल्हापूर : अखंड सौभाग्य व जन्मोजन्मी पती साथ मिळावा यासाठी सुवासिनींच्यावतीने आज गुरुवारी वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. तर ...
कोल्हापूर : अखंड सौभाग्य व जन्मोजन्मी पती साथ मिळावा यासाठी सुवासिनींच्यावतीने आज गुरुवारी वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. तर कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतीक असलेले कर्नाटकी बेंदूर उद्या शुक्रवारी साजरी होत आहे. पाठोपाठ आलेल्या या दोन्ही सणांसाठी बाजारपेठेत पूजेचे साहित्य, आंबे आणि मातीच्या बैलजोडी यांची मोठी उलाढाल झाली.
उन्हाळ्यानंतर वटपौर्णिमा हा माॅन्सूमध्ये येणारा पहिला सण. पुराणकाळातील सत्यवान सावित्रीच्या कथेने जोडल्या गेलेल्या या सणाला पर्यावरणरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला जातो. यानिमित्त सुवासिनी वडाच्या झाडाचे पूजन करतात. दिवसभर व्रतस्थ राहून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. यानिमित्त वडाला बांधली जाणारी दोर, वस्त्रमाळ, नारळ, सूप, हिरव्या बांगड्या, काळे मण्या, महिलांच्या ओटीत घालण्यासाठी आंबे, फणसाचे गरे, केळी, जांभूळ अशा पूजेच्या साहित्यांची खरेदी केली जात होती.
भारताला लाभलेल्या कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेला कर्नाटकी बेंदूर शुक्रवारी साजरा होत आहे. यादिवशी ज्यांच्या घरी बैल, गाय, म्हैस आहे ते या मुक्या प्राण्यांना न्हाऊ माखू घालून त्यांचे औक्षण करतात. पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो. तर घराघरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जाते. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी बैलजोडीची विक्री केली जात होती. दुपारी चारवाजेपर्यंतच बाजारपेठ सुरू असल्याने शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट यासह चौकाचौकांमध्ये या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.
--
फोटो नं २३०६२०२१-कोल- वटपौर्णिमा ०१, ०२
ओळ : आज गुरुवारी साजरा होणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त सणाच्या पूर्वसंध्येला बुधवारी कोल्हापुरातील बाजारपेठेत आंबे व वडाच्या फांद्यांची खरेदी केली जात होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
फोटो नं २३०६२०२१-कोल-बेंदूर
कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेला बेंदूर सण उद्या शुक्रवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त कोल्हापुरातील कुंभार गल्लीत माती व प्लॅस्टरपासून बनवलेले आकर्षक बैलजोडी विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--