'ए लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय बोलणार? (सॉरी, काय दाखवणार?)
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:35 AM2019-04-16T10:35:47+5:302019-04-16T11:39:52+5:30
भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती.
कोल्हापूर - नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेतही राज ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे भाजपा आणि मोदीविरुद्ध प्रचार केला. त्यानंतर, आज कोल्हापुरात राज यांची भाजपविरोधी प्रचारसभा होत आहे. राज ठाकरेंच्या या सभेचं स्वाभीमनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वागत केलंय. तसेच उद्या इतिहास घडणार, राजू शेट्टींचा प्रचार राज ठाकरे करणार असे ट्विट राजू शेट्टींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच भाजपाचे हे दोन्ही नेते जनतेला फसवत आहेत, असे म्हणत राज यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोदी सरकारला टार्गेट केलं. तर, या सभेत राज यांनी भाजपाच्या डीजिटल इंडियाच्या जाहिरातीमधील मॉडेलच व्यासपीठावर आणला होता. त्यामुळे राज यांची सोलापुरातील सभा वेगळीच ठरली आहे.
भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचं चित्र दाखवण्यात आलं होतं. गावात इंटरनेट असल्याचं, दुकानांवर डिजिटल पेमेंट होत असल्याचं भाजपानं जाहिरातीत दाखवलं होतं. मात्र, हरिसाल गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं दाखवलं. हरिसाल गावातल्या तरुणाला यावेळी राज यांनी मंचावर आणलं. 'हरिसाल गावाच्या जाहिरातीत दिसलेला हा तरुण सध्या सगळीकडे नोकरीसाठी भटकतोय. काही मनसे कार्यकर्त्यांना पुण्यात हा तरुण भेटला आणि त्यानंतर तो माझ्या संपर्कात आला,' असं राज यांनी सांगितलं. राज यांच्या सोलापूर सभेतील हे दृश्य चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे. त्यामुळे सोलापूरनंतर राज ठाकरेंची आज कोल्हापुरात सभा होत आहे.
राज ठाकरेंच्या या सभेचं खासदार आणि महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टींनी स्वागत केलं असून इतिहास घडविण्यासाठी राज ठाकरे कोल्हापुरात येत असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या सभेत नेमकं काय पाहायला मिळणार, कोल्हापुरात येऊन राज ठाकरे काय बोलणार ? याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, हे अकाऊंट राजू शेट्टींचे अधिकृत अकाऊंट आहे, याची खात्री नाही. पण, राजू शेट्टींसदर्भातील बातम्या या अकाऊंटवरुन शेअर करण्यात येत आहेत.
इचलकरंजी मध्ये उद्या इतिहास घडणार,कारण राजू शेट्टी साहेबांचा प्रचार राज ठाकरे साहेब करणार. pic.twitter.com/FxN3oqHt10
— Raju Shetti (@rajushetti) April 15, 2019