आज-यात भातरोप लागणीच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:04+5:302021-06-24T04:17:04+5:30
यांत्रिकी पद्धतीने चिखल रोप आजरा : आजरा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने भातरोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
यांत्रिकी पद्धतीने चिखल
रोप
आजरा : आजरा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने भातरोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनावरांची कमतरता असल्याने यांत्रिकी पद्धतीने रोप लागणीसाठी चिखल केला जात आहे. तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागण केली जाते. सर्वत्र भातरोप लागण सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. भातरोप लागण चारसूत्री किंवा दोरी पद्धत यापैकी एका पद्धतीने केली जाते.
तालुक्यात ९७०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी, धूळवाफ पेरणी व टोकणनी आणि भात रोप लागण केली जाते.
पावसाचे प्रमाण जास्त असणा-या ठिकाणी भात रोप लागण केली जाते. ३२०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली. १२०० हेक्टर क्षेत्रावर धूळवाफ पेरणी व टोकणनी तर ५३०० हेक्टर क्षेत्रावर भाताची रोप लागण पद्धतीने उत्पादन घेतले जाते. भाताची पेरणी व टोकणनीने उत्पादन घेतल्यास त्याला कोळपणी व भांगलणी करावी लागते. कष्ट जास्त आहेत. तर भाताची रोप लागण केल्यास सुरुवातीला थोडी जास्त मेहनत करावी लागते.
तालुक्यातील सुळेरान, घाटकरवाडी, दाभील, एरंडोळ, पोळगाव, गवसे, विटे, लाटगाव, हरपवडे, कोरीवडे परिसरात मोठ्या प्रमाणात भात रोप लागण केली जाते. गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे भात रोप लागणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
रोप लागणीसाठी युरिया ब्रिकेटचा वापर
तालुक्यात भातरोप लागण चारसूत्री व दोरी पद्धतीने केली जाते या दोन्ही पद्धतीसाठी युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो. लागण करते वेळी युरिया ब्रिकेटचा उपलब्धता झाल्यास ते पिकाला पोषक असते. त्यामुळे अनेक शेतकरी मे महिन्यातच युरिया ब्रिकेटचा भात रोप लागणीसाठी साठा करून ठेवतात.
रोप लागणमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव
भात रोप लागण करतेवेळी केला जाणारा चिखल महत्त्वाचा असतो. हा चिखल पूर्वी बैलांच्या साहाय्याने केला जात होता. मात्र सध्या बैलांची संख्या कमी झाल्यामुळे यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने पॉवर ट्रिलरने चिखल केला जातो. यासाठी वेळ व श्रमाची बचत होते. सध्या शेतक-यांचा यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने चिखल करण्याकडे कल वाढला आहे.
फोटो ओळी : सावरवाडी (ता. आजरा) येथील अजित सावंत यांच्या शेतात सुरू असलेली भातरोप लागण.
क्रमांक : २३०६२०२१-गड-०४