‘वडाप’वर आजपासून कारवाईचा बडगा
By admin | Published: April 7, 2017 12:25 AM2017-04-07T00:25:59+5:302017-04-07T00:25:59+5:30
प्रादेशिक परिवहन अधिकारी : महापालिकेच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन; चार पथके तयार; रिक्षा करणार जप्त
कोल्हापूर : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी चार फिरती पथके तयार करण्यात आली असून, आज, शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होईल, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाला दिले. अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर येत्या पंधरा दिवसांत अवैध प्रवासी वाहतूक रोखली नाही, तर मात्र आम्ही स्वत: रस्त्यांवर उतरून कारवाई करू, असा इशारा महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी दिला.
कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतूक (वडाप) मोठ्या प्रमाणात सुरूआहे. तसेच शहर हद्दीत परवाना नसतानाही सहा आसनी रिक्षा वाहतूक सुरूआहे. त्यामुळे या दोन्ही अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी आणि केएमटी वाचवावी, अशी मागणी करण्यासाठी महानगरपालिकेचे उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, विजय खाडे, अभिजित चव्हाण, अशोक जाधव, प्रताप जाधव, सूरमंजिरी लाटकर, उमा बनसोडे, शोभा कवाळे, माधुरी लाड, प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डी. टी. पवार यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
तीन केएमटी बसमधून हे सर्वजण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले. ‘हटाव हटाव - वडाप हटाव’, ‘वडाप हटाव, केएमटी बचाव’ अशा घोषणा देतच सर्वजण डी. टी. पवार यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी पवार हे त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत बसले होते.
परिवहन सभापती खान, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, अशोक जाधव, सूरमंजिरी लाटकर यांनी शिष्टमंडळ घेऊन येण्याचे कारण सांगितले. शहरात अवैध वाहतूक सुरूअसल्याने केएमटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. हजारो बेकायदेशीर रिक्षामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अडचणी येऊ नयेत : पवार
कारवाई करताना काय अडचणी येतात याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे कारवाई सुरूझाली की पुन्हा अशा अडचणी येऊ नयेत, अशी अपेक्षा डी. टी. पवार यांनी व्यक्तकेली. आम्ही अशा वडाप रिक्षा वाहतुकीला आळा घालण्याकरिता चार पथके तयार केली असून आज, शुक्रवारपासून ही कारवाई सुरूहोईल. एक पथक कायमस्वरूपी तैनात केले जाईल. सहा आसनी रिक्षा तसेच आयुष्य संपलेल्या रिक्षा जप्त केल्या जातील, तसेच प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही पवार म्हणाले.
फोनवर दम देतात ...
प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ‘आम्ही कारवाई सुरूकेली की लगेच फोनवर दम दिला जातो. कारवाईत व्यत्यय आणला जातो. असा अनुभव येणार नाही याची दक्षता आपण सर्वजणांनी घ्यावी’, अशी विनंती केली. आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीला कधीही पाठीशी घातले नाही; पण फोनवर दम दिल्याने त्यात खंड पडतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी त्यांना रोखत शारंगधर देशमुख यांनी त्यांना अशा कारवाईत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, उलट आम्ही सोबतच राहू, असे सांगितले.
पंधरा दिवसांची मुदत
शहरातील वडाप वाहतूक बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. जर या पंधरा दिवसांत वडाप पूर्णपणे बंद झाले नाही तर मात्र आम्ही सर्व नगरसेवक, केएमटीचे कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वत: कारवाई करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.