‘लोकमत’चा आज वर्धापनदिन समारंभ
By admin | Published: March 24, 2017 11:45 PM2017-03-24T23:45:48+5:302017-03-24T23:45:48+5:30
सांगलीत स्नेहमेळावा : दीड तपाची वाटचाल
सांगली : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने सांगलीत १७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध क्षेत्रांशी असलेले प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी आज (शनिवार, दि. २५ मार्च) माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़
वाचकांशी असलेले विश्वासार्हतेचे घट्ट नाते जपत ‘लोकमत’ने दीड तपाची यशस्वी वाटचाल केली आहे. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कलेचे माहेरघर असलेल्या या सांगलीत ‘लोकमत’ रुजला आणि वाढला़ प्रगतीची गरुडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल गेली सतरा वर्षे सुरू आहे.
विविध क्षेत्रांशी असलेले हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सुनील पवार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संगीता हारगे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्याला सुरुवात होणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, हितचिंतकांनी उपस्थित राहून स्नेह वृद्धिंगत करावा. पर्यावरण व स्वच्छतेचा मंत्र जपताना पुष्पगुच्छ, पुष्पहाररूपी शुभेच्छांना फाटा देण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. मेळाव्यास येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार घेऊन येऊ नये, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विशेषांकाचे प्रकाशन
‘स्थानिक स्वराज्य’ या संकल्पनेवर झालेली जिल्ह्याची वाटचाल, त्याचे फायदे-तोटे, उणिवा आणि सकारात्मक परिणाम, इतिहास आणि भविष्यातील स्थिती अशा सर्व अंगांनी परिपूर्ण असलेला ‘स्थानिक स्वराज्य’ हा विशेषांक वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होत आहे. संग्राह्य अशा या विशेषांकात अनेक तज्ज्ञ लेखक व मान्यवरांनी लेखन केले आहे. त्याचे प्रकाशनही स्नेहमेळाव्यावेळी होणार आहे.