‘अंनिस’चे साहित्य संमेलन आजपासून
By admin | Published: May 14, 2016 12:49 AM2016-05-14T00:49:46+5:302016-05-14T00:49:46+5:30
सांगलीत नामवंतांची उपस्थिती : विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी विचारमंथन
सांगली : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनास आज, शनिवारपासून सांगलीत सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातील ख्यातनाम विचारवंत, साहित्यिकांची उपस्थिती असणार आहे. विचारमंचाची सजावट, मंडप उभारणी, बैठक, भोजन व निवास व्यवस्था, आदी तयारी पूर्ण झाली असून, राज्यभरातील कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळपासूनच संमेलनस्थळी येण्यास सुरुवात झाली आहे.
‘अंनिस’चे मुखपत्र असलेल्या ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रा’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त हे साहित्य संमेलन होत आहे. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात आज, शनिवार (दि. १४) व रविवार (दि. १५) हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. आ. ह. साळुंखे संमेलनाचे अध्यक्ष असून, अहमदाबाद येथील ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
गुरुवारी सायंकाळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे प्रकाशन झाले होते. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल सभागृहाबाहेर ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी वेगळा मंडप उभारण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्थाही सभागृह आवारातील मैदानावरच करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘अंनिस’चे कार्यकर्ते संमेलनाच्या तयारीसाठी झटत होते. शुक्रवारी सायंकाळपासूनच राज्यभरातील कार्यकर्ते सांगलीत येण्यास सुरुवात झाली असून त्यांच्या निवासाची सोय संमेलनस्थळापासून जवळच असलेल्या पाटीदार भवनात करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची बैठक झाली. संमेलन यादगार बनविण्याबरोबरच येणाऱ्या मान्यवरांची उत्तम सोय करण्याचा व त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
संमेलन स्थळाला मान्यवरांची नावे
समाजात परिवर्तनाची आस धरून संघटनेला जीवन वाहिलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी संमेलनस्थळाला मान्यवरांची नावे देण्यात आली आहेत. संमेलन स्थळाला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव देण्यात आले आहे, तर प्रवेशद्वारास गोविंद पानसरे यांचे, ग्रंथदालनास प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे, विचार मंचास सावित्रीबाई फुले, तर सांस्कृतिक मंचास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वार्तापत्र प्रदर्शन विभागास अॅड. दत्ताजीराव माने आणि सभागृहास सा. रे. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. भोजन कक्षास जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम मस्के यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनस्थळी वायफायची मोफत सुविधा पुरवण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात बसवण्यात आले आहेत. अॅड. के. डी. शिंदे स्वागताध्यक्ष आहेत. ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, उमेश सूर्यवंशी, राजीव देशपांडे आणि अंनिसचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
संमेलनातील आजचे कार्यक्रम
सकाळी उद्घाटन सत्र : सकाळी १० ते १ : संमेलनाध्यक्ष - डॉ. आ. ह. साळुंखे, उद्घाटक - डॉ. गणेश देवी. दुपारी २ ते ४.३० : विवेकवादी नियतकालिकांच्या संपादकांचा परिसंवाद : विषय - भारतातील विविध भाषांतील विवेकवादी मासिकांची वाटचाल. सहभाग - के. वीरमणी (तमिळनाडू), मिसेस मैत्री (आंध्र प्रदेश), रामस्वर्ण लक्खोवाली (पंजाब), हर्षा भेडा (गुजरात), नरेंद्र नायक (कर्नाटक), राजवीर सिंह (उत्तर प्रदेश), सौमित्र बॅनर्जी ( पश्चिम बंगाल). दुपारी ४.३० ते ६.३० : कविसंमेलन : संमेलनाध्यक्ष - शामसुंदर सोन्नर महाराज. सायंकाळी ७ ते ९ : पुरोगामी कीर्तन : सहभाग - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज (अकोट).