महाडिक-सतेज पाटील गटाचे आज अर्ज
By Admin | Published: March 23, 2015 12:25 AM2015-03-23T00:25:06+5:302015-03-23T00:33:09+5:30
‘राजाराम’ची रणधुमाळी : शक्तिप्रदर्शन नाही
कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल होणार आहेत.करवीर, हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी आणि कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा आता सर्वत्र जोरात उडाला आहे. चुरसही वाढली आहे. १९ एप्रिलला मतदान आणि २० एप्रिलला निकाल असणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २१९ अर्जांची विक्री होऊन ६८ जणांनी अर्ज दाखल केले.
या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गटातील टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे. दोन्हीही गटांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. २४) छाननी होणार आहे, तर २५ तारखेला छाननीनंतरची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
बुधवारी (दि. ८ एप्रिल)पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ९ एप्रिलला पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्हीही गटांकडून कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार नाही. जशा नेत्यांकडून सूचना येतील, त्याप्रमाणे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही गटांकडून काही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तरीही आज आणखी अर्ज दाखल केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)