जेवणाची भ्रांत असलेल्या स्वरकुबेराची आजपासून जन्मशताब्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:08 PM2018-07-25T13:08:00+5:302018-07-25T13:18:29+5:30
काशीपर्यंत भटकायला लावून, गाणं म्हटल्यानंतर चादरीवर टाकलेले पैसे त्याला गोळा करायला लावले. मात्र या गरिबीच्या झळांमधूनच सुधीर फडके नावाचं हे शंभर नंबरी सोनं रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागलं.
समीर देशपांडे
कोल्हापूर : प्रख्यात वकिलाचा हा मुलगा. जन्म १९ जुलै १९१९ चा. तिसरीत असताना आईचे निधन. यानंतर खचलेलं घर लवकर उभारलंच नाही. घरातील एक-एक वस्तू विकून गुजराण करण्याची वेळ आली. दोन वेळचं जेवण मिळण्याची भ्रांत असलेल्या या मुलाला गोड गळा होता. मात्र नियतीनं त्याची पदोपदी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. काशीपर्यंत भटकायला लावून, गाणं म्हटल्यानंतर चादरीवर टाकलेले पैसे त्याला गोळा करायला लावले. मात्र या गरिबीच्या झळांमधूनच सुधीर फडके नावाचं हे शंभर नंबरी सोनं रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागलं.
कोल्हापूरच्या रामचंद्र विनायक फडके या मुलाची ही चित्तरकथा. अविरत अशी मानहानी सोसलेल्या या मुलाने मात्र आपल्या स्वरांमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील रसिकांना डोलायला लावले. हाच मुलगा म्हणजे स्वरकुबेर सुधीर फडके होय. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ होत आहे.
देव, देश, धर्म ही भालजी पेंढारकरांची त्रिसूत्री ज्यांनी आयुष्यभर पाळली, त्या सुधीर फडके यांच्या स्मृती कोल्हापूरमध्ये त्यांच्या मूळ गावी जतन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. फडके यांचे आजोबा देवगडजवळील फणसे गावातून कोल्हापूरला आले.
जोशीरावांच्या बिनखांबी गणेश मंदिरामध्ये त्यांनी वेदशाळा सुरू करून मोफत शिक्षण सुरू केले. त्यांचे चिरंजीव अॅड. विनायक फडके. सुधीर फडके यांच्यासह त्यांना एकूण पाच मुले. लहानपणीच पं. वामनराव पाध्ये यांनी आनंदाने सुधीर फडके यांना अध्यापन सुरू केलं. विद्यापीठ हायस्कूलमध्ये फडके यांचं थोडं शिक्षण झालं. १९३0 च्या सुमारास ते मुंबईला गेले.
तीन वर्षांत त्यांना पुन्हा कोल्हापुरात यावं लागलं. हातातोंडाची गाठ पडताना नाकी नऊ येत होते. पंडितराव ठाणेकर यांच्या श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासमध्ये १४ व्या वर्षी ते गाणं शिकवू लागले. १९३६ ला वडिलांचे निधन झाले आणि सुधीर फडके पुन्हा मुंबईत आले. १९३७ मध्ये मुंबई आकाशवाणीवरून त्यांचं पहिलं गाणं सादर झालं.
पण दुर्दैव त्यांची पाठ सोडत नव्हतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही पदाधिकाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागलं. दुकानांच्या फळ्यांवर झोपण्याची वेळ आली. पहाटे दूधवाले, पेपरवाले येण्याआधी उठून सार्वजनिक शौचालयात जाऊन यावं लागे. तिथेच अंघोळही उरकायची. पोटासाठी काहीतरी करावे म्हणून चहापासून भाजी विकण्याचाही व्यवसाय करून पाहिला; पण यश नाही. अखेर मुंबई सोडण्याचा निर्णय झाला.
वाट फुटेल तिकडे जायचे ठरले. मालेगावपासून ते काशीपर्यंतची भ्रमंती सुरू झाली. या गावातून पुढच्या गावातील मान्यवरांसाठी पत्र घ्यायचे. तेथे जाऊन एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती करायची. ते देतील त्या पैशांतून पुढच्या गावासाठी जायचे, असा दिनक्रम सुरू झाला. कुणाच्या तरी घरात पोटभर जेवण मिळतंय हेच नशीब, अशी परिस्थिती झाली. कोलकात्यातून आजारी भावाला भेटण्यासाठी ते पुन्हा ते कोल्हापुरात आले आणि त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
माधव पातकरांनी त्यांना एका गीताला चाल देण्याची विनंती केली. यानंतर मग त्यांची भेट ग. दि. माडगूळकर, वसंतराव कामेरकर यांच्याशी झाली आणि एका स्वरप्रवासाला सुरुवात झाली. ‘गीतरामायण’ सादर झाले आणि ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके हे नाव घरोघरी झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि नाट्य अकादमीने त्यांचा गौरव केला आणि सुधीर फडके हे नाव चिरंतन राहिले.
...अन् बारसे झाले
सुधीर फडके यांचे मूळ नाव राम फडके; परंतु श्रीकृष्ण संगीत मेळ्यामध्ये गीतकार म्हणून राम फडके हे नाव योग्य नाही, असं सांगत संवादलेखक न. ना. देशपांडे यांनी परस्परच ‘सुधीर फडके’ असे नामकरण केले आणि पुढे तेच मराठी भावगीतांमध्ये अजरामर झाले.
सुधीर फडके यांचा जन्म कोल्हापूरचा. उमेदवारीचा काळ त्यांनी येथे व्यतीत केला. पुणे आणि मुंबई येथे त्यांची कारकिर्द बहरली असली तरी त्याचा पाया कोल्हापुरात घातला गेला आहे. त्यामुळेच आम्ही बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम करणार आहोत. मात्र त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याची गरज आहे.
- चंद्रकांत जोशी
अध्यक्ष, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी