शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:15 AM2018-03-19T00:15:46+5:302018-03-19T00:15:46+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार प्रमुख उपस्थित आणि अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असणार आहेत. या वर्षी ५० हजार ४४४ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. यातील २४ हजार २४५ स्नातक हे प्रत्यक्षात उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत.
सन २०१७-१८ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यांतील गुणवत्ताप्राप्त तसेच व्यक्तिमत्त्व, वर्तणूक व नेतृत्वगुण यांबाबतचे विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटील हिला, तर वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे हिला एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. विविध विद्याशाखांतील एकूण ४९ संशोधक विद्यार्थिनींना पीएच. डी. व एम. फिल. पदवी आणि विविध गुणवत्ताप्राप्त ३५ विद्यार्थ्यांना व्यासपीठावर पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. या समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीचे उद्घाटन सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते होईल. कमला कॉलेज, जनता बझार, राजारामपुरी, माउली चौक, सायबर चौकामार्गे विद्यापीठातील लोककला केंद्रात ग्रंथदिंडीचा समारोप होईल. सायंकाळी पाच वाजता लोककला केंद्रामध्ये मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बापलेक घेणार कायद्याची पदवी
तुरंबे (जि. कोल्हापूर) : शिकण्याची अखंड जिद्द बाळगत सेवानिवृत्तीला अवघी सात वर्षे बाकी असताना कुंडलिक पांडुरंग हातकर यांनी कायद्याची पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी स्नेहलनेही कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आज, सोमवारी होणाºया दीक्षांत समारंभात बापलेकींचा एकाचवेळी गौरव होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल या बापलेकीचे कौतुक होत आहे. तुरंबे (ता. राधानगरी) येथील हातकर व त्यांची मुलगी स्नेहल यांनी एकाचवेळी एकाच महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.