हौद हटविण्याबाबत आज निर्णय

By admin | Published: April 28, 2016 01:15 AM2016-04-28T01:15:56+5:302016-04-28T01:20:53+5:30

महानगरपालिकेत बैठक : पर्यायी पुलाबाबत शहर अभियंता करणार पाहणी

Today's decision about debris removal | हौद हटविण्याबाबत आज निर्णय

हौद हटविण्याबाबत आज निर्णय

Next

कोल्हापूर : शहरातील शिवाजी पुलाजवळ बांधण्यात येत असलेल्या पर्यायी पुलाच्या बांधकामाआड येणारा पाण्याचा हौद हलविण्यासंदर्भात आज, गुरुवारी जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेण्याचे बुधवारी सायंकाळी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत ठरले. महानगरपालिकेने पाण्याचा हौद स्थलांतर करण्यासाठी जागा द्यायची असून, त्याची पुनर्बांधणी सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असल्याचे यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी पुलाजवळील पाण्याचा हौद हलविण्याबाबत चर्चा केली.
शिवाजी पुलाला पर्यायी पूल म्हणून बांधत असताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. महानगरपालिकेने या बांधकामाच्या आड येणारी झाडे तोडली. नाक्याची इमारत पाडण्यात आली. दोन आठवड्यांत पुलाच्या बांधकामास पुरातत्त्व विभागातर्फे परवानगी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. तोपर्यंत या मार्गात येणारा पाण्याचा हौद हलवावा, अशी मागणी माजी महापौर आर. के. पोवार यांनी केली.
१२ एप्रिलला आपण स्वत: हेरिटेज समितीला पत्र पाठवून हौदाचे काय करायचे यासंदर्भात अभिप्राय देण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून अद्याप अभिप्राय आलेला नाही. आम्ही हौदासाठी पर्यायी जागा देऊ, पण तो बांधून देण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. आज, गुरुवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन हौदाची पाहणी करण्यास व पर्यायी जागा सुचविण्यास सांगण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी आर. के. पोवार यांच्यासह दिलीप पवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, लाला गायकवाड, अशोक भंडारे, विक्रम जरग, महादेव पाटील, राजू सावंत,हिंदुराव शेळके,चंद्रकांत बराले, बजरंग शेलार, रूपाली पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कोल्हापुरातील शिवाजी पुलाला पर्याय म्हणून बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या हौदासंदर्भात बुधवारी महानगरपालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आर. के. पोवार, बाबा पार्टे, लाला गायकवाड, दिलीप पवार, अशोक भंडारे उपस्थित होते.

Web Title: Today's decision about debris removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.