‘सनातन’वर मोर्चास परवानगीचा आज निर्णय
By admin | Published: March 22, 2015 10:38 PM2015-03-22T22:38:49+5:302015-03-23T00:42:16+5:30
शर्मा : कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई
कोल्हापूर : ‘सनातन प्रभात’ संघटनेच्या कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलातर्फे उद्या, मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास परवानगी दिल्यास प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूची परिस्थिती पाहून मोर्चास परवानगी द्यायची की नाही, याबाबत आज, सोमवारी निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रविवारी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी ‘सनातन संघटने’चे लागेबांधे असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून होत आहे. त्यामुळे याची विचारणा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे ‘सनातन प्रभात’ संघटनेच्या शाहूपुरीतील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. परंतु, हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देऊ नये; अन्यथा प्रतिमोर्चा काढू, असा इशारा दिला आहे. या दोन्ही संघटनांच्या भूमिकामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, अद्याप श्रमिक मुक्ती दलाकडून मोर्चास परवानगी मिळण्यासाठी पत्रव्यवहार केलेला नाही.
दोन्ही संघटनांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संघटनेने मोर्चास परवानगी मिळण्यासाठी आज लेखी मागणी केली, तर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल; परंतु कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)