शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:06+5:302021-02-25T04:32:06+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि त्या ऑनलाईन की, ऑफलाईन ...
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि त्या ऑनलाईन की, ऑफलाईन पध्दतीने घ्यावयाच्या, याबाबतचा निर्णय आज, गुरुवारी शिवाजी विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे. या परिषदेची बैठक दुपारी बारा वाजता सुरू होईल.
कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील परीक्षांसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याच्या मुदतीमधील अखेरचा दिवस गुरुवार आहे. या सत्रातील मार्च-एप्रिल दरम्यान ६२१ परीक्षा होणार आहेत. त्यात पहिल्या सत्राच्या परीक्षांची संख्या शंभर आहे. सुमारे दोन लाख विद्यार्थी या परीक्षांसाठी नोंदणी करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या परीक्षांचे स्वरूप, त्या घेण्याची पद्धती आणि वेळापत्रक आदींबाबत विद्या परिषदेत निर्णय होणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. महाविद्यालय संलग्नतेबाबत सकाळी दहा वाजता व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. त्याबाबत विद्यापीठात किसान सभेचे शिष्टमंडळ सायंकाळी पाच वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांना भेटणार आहे.