आज महिला उमेदवार नशीब अजमावणार
By admin | Published: November 18, 2014 10:56 PM2014-11-18T22:56:38+5:302014-11-18T23:23:33+5:30
वनरक्षक शारीरिक चाचणी : २४०० उमेदवारांचा सहभाग
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील वनरक्षक पदाच्या ५८ जागांसाठी शारीरिक चाचणीला काल, सोमवारपासून प्रारंभ झाला़ सोमवारी आणि आज, मंगळवारी उमेदवारांची धावण्याची चाचणी कागल पंचतारांकित एमआयडीसी येथील रस्त्यावर घेण्यात आली़ यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्णांतील २४०० उमेदवारांनी सहभाग नोंदविला. महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी उद्या, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे़ कोल्हापूर विभागासाठी ३४७६ अर्ज आले आहेत.
पुरुष उमेदवारांना तीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटर अंतर, तर महिला उमेदवारांना तीन किलोमीटर अंतर धावून पूर्ण करायचे आहे. वनरक्षक पदांसाठी आॅगस्टमध्ये जाहिरात देण्यात आली होती; पण विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे शारीरिक चाचणीची पुढे ढकलण्यात आली होती. उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीतील गुण आणि बारावीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे होणार आहे.
शारीरिक चाचणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील वनखात्याचे ३५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे.
उद्या होणाऱ्या शारीरिक चाचणीत २४२ महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. दरम्यान, काल घेण्यात आलेल्या चाचणीत गोंधळ उडाल्याची चर्चा होती. याबाबत कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्याशी संपर्क
साधला असता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)