मुख्याध्यापक संघाची आजची सभा वादळी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:45+5:302020-12-08T04:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजताची सभा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजताची सभा वादळी होणार आहे. विषयपत्रिकेवरील नवीन कार्यकारिणी निवडीच्या विषयावर विरोधकांनी हरकत घेतली असून यावरच सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी होणार हे निश्चित आहे.
मुख्याध्यापक संघाची दर तीन वर्षाला कार्यकारिणीची निवड होते. मागील निवडणुकीत ५२ वर्षांनंतर सत्तांतर झाले होते. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील, दत्ता पाटील यांनी बाजी मारली होती. कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने सर्वसाधारण सभेत निवड करण्याचा पोटनियम आहे. त्याचा आधार घेत सत्तारूढ गटाने २ डिसेंबरला सभेचे आयोजन केले होते. मात्र, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता असल्याने सभा रद्द करावी लागली. विषयपत्रिकेवरील पाचव्या क्रमांकाच्या कार्यकारिणी निवडीच्या विषयावर विरोधकांनी धर्मादाय आयुक्तांकडे हरकत घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी होती; मात्र, सत्तारूढ गटाचे वकीलच हजर राहिले नसल्याने पुढील तारीख देण्यात आली. सत्तारूढ गटाकडून सभेतच हात वर करून मतदान घेण्याची व्यूहरचना आहे तर रितसर गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी विरोधकांची आहे. त्यामुळे आजची सभा वादळी होणार हे निश्चित आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत सत्तारूढ व विरोधी गटांत वाटाघाटी सुरू होत्या.
याबाबत, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्तात्रय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सभेबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितले. विरोधी गटाचे व्ही. जी. पोवार यांच्याशी संपर्क साधला असता, सभेतील विषयावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
- राजाराम लोंढे