रत्नागिरीत आज बैठक
By admin | Published: September 23, 2014 12:35 AM2014-09-23T00:35:20+5:302014-09-23T00:47:03+5:30
‘सर्किट बेंच’प्रश्नी आंदोलनाची दिशा ठरणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीचे सदस्य गेली २५ वर्षे लढा देत आहेत, परंतु या मागणीला उच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा व स्वरूप ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांची उद्या, मंगळवारी रत्नागिरी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूरला खंडपीठ व तत्पूर्वी सर्किट बेंच व्हावे यासाठी तब्बल ५८ दिवस सहा जिल्ह्यांतील वकिलांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन केले. बैठकीत उच्च न्यायालयाकडून सर्किट बेंचबाबत फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत. आपल्या कोर्टातील चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात टाकून कृती समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा नव्या जामोने सुरू करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला. त्यानुसार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी ३० आॅगस्टला एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळत लालफिती लावून काम केले. कृती समितीच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रत्नागिरीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते, अॅड. अशोक पाटील, अॅड. दीपक पाटील, अॅड. प्रशांत चिटणीस, अॅड. बाळासो पाटील, अॅड. सुशांत गुडाळकर, अॅड. तेजगोंडा पाटील, आदींसह २५ सदस्य कोल्हापुरातून सहभागी होणार आहेत.