कोल्हापूर महासभेत घरफाळा विषयावरून होणार खडाजंगी-आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 07:32 PM2019-02-11T19:32:37+5:302019-02-11T19:34:20+5:30
शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा जादा मिळकतीच्या करात
कोल्हापूर : शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा जादा मिळकतीच्या करात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याशिवाय पाणीपट्टी, नगररचना शुल्क, परवाना विभागाच्या करात काही प्रमाणात वाढ सुचविली आहे, पण ही वाढ फेटाळण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेत घरफाळासह विविध विषयावर चर्चा होणार आहे. सध्या महानगरपालिका हद्दीत सुमारे १ लाख ५२ हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे २७ हजार मिळकती या कमर्शिअल आहेत, तर त्यापैकी १० हजार ८०० मिळकती भाडेपट्टीने कुळाला दिलेल्या आहेत.
२०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही मिळकतींची कर आकारणी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता, त्यावर निर्णय न घेता चर्चेसाठी महासभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे आज, मंगळवारच्या सभेत या घरफाळा विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवर करवाढीचा बोजा न टाकता प्रस्तावास उपसूचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा अधिक मिळकतीचा फाळा काही प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.याशिवाय पाणीपुरवठा, नगररचना, परवाना, इस्टेट आदींच्याही करात वाढ करण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध होऊन चर्चेअंती ही दरवाढ फेटाळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- शहरात एकूण मिळकती : १,५२,०००
- कमर्शिअल मिळकती : १६,८२०
- भाडेपट्टी (कूळ) : १०,१८०