वकिलांचे आज लाक्षणिक उपोषण
By admin | Published: August 19, 2016 12:56 AM2016-08-19T00:56:54+5:302016-08-19T01:03:24+5:30
सर्किट बेंच : सहा जिल्ह्यांतील १७ हजार वकील सहभागी होणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, यासाठी आज, शुक्रवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकील ज्या-त्या जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणामुळे पुन्हा एकदा थंड झालेल्या या आंदोलनाला गती मिळणार आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील न्यायसंकुलाच्या आवारात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांचा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी लढा सुरू आहे; पण अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्किट बेंचप्रश्नी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात बार असोसिएशनच्या सत्कारावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित घटकांची या प्रश्नी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.
दरम्यान, या सहाही जिल्ह्यांतील वकील ‘आता नाही तर कधीच नाही,’ या भावनेने पेटून उठले आहेत. प्रसंगी सनद सोडण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. यावरून भविष्यात सर्किट बेंचचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
(छायाचित्र पान ८ वर)