मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आजपासून
By admin | Published: May 21, 2016 12:34 AM2016-05-21T00:34:24+5:302016-05-21T01:00:55+5:30
दिग्गज विचारवंतांचा सहभाग : विविध विषयांवरील चर्चासत्रे, वैचारिक मेजवानी
कोल्हापूर : मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज, शनिवारी सकाळपासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यात दिग्गज विचारवंतांसह महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या लेखकांचाही सहभाग आहे. संमेलनानिमित्त विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिसंवादांतून वाचकांना वैचारिक मेजवानीचा लाभ घेता येणार आहे.संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटक अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती राहील. स्वागताध्यक्ष म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी शफाअत खान लाभले आहेत. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आमदार राजेश क्षीरसागर, एम. सी. ए. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खलील पटेल यांनी अनुवाद केलेल्या ‘तीन तेरा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच स्व. लीलावती काकडे यांच्या स्मरणार्थ आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. दरम्यान, सकाळी १०.३० वाजता विविध हौशी कलाकारांच्या चित्रांचा व छायाचित्रांचा समावेश असलेल्या आबालाल रहेमान कलादालनाचे उद्घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी २.३० वाजता ‘वर्तमान वास्तव आणि मुस्लिम मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली, प्रा. डॉ. फारूख तांबोळी, प्रा. डॉ. पांडुरंग कंद, प्रा. डॉ. आरिफ शेख, प्रा. डॉ. गिरीश मोरे, प्राचार्य फारूक शेख हे वक्ते सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर असतील.दुपारी चार वाजता ‘पर्यावरणविषयक प्रश्नांना आजचे साहित्य भिडते आहे काय?’ या विषयावरील परिसंवादात आमदार पाशा पटेल, विलास सोनवणे, प्रा. डॉ. महेंद्र कदम, डॉ. एम. सी. शेख हे वक्ते आपले विचार मांडणार
आहेत. परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार हे भूषविणार आहेत. सायंकाळी सात वाजता
हिंदी चित्रपट गीतकार समीर
यांच्याशी मुक्त संवाद होणार
आहे. यावेळी रियाज शेख, असिफ जमादार-शेख त्यांच्याशी संवाद साधतील.
रात्री आठ वाजता कविसंमेलन होणार असून विविध भागांतून आलेले निमंत्रित कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. अध्यक्षस्थानी सय्यद अल्लाउद्दीन असतील. संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)