'जिल्हा बार'साठी आज मतदान

By admin | Published: April 29, 2016 11:52 PM2016-04-29T23:52:42+5:302016-04-30T00:45:31+5:30

४२ जण रिंगणात : खंडपीठ, न्याय संकुलातील सुविधांच्या मुद्द्यावर प्रचार रंगला

Today's poll for 'District Bar' | 'जिल्हा बार'साठी आज मतदान

'जिल्हा बार'साठी आज मतदान

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी आज, शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी १८९२ सभासद पात्र आहेत. खंडपीठ, न्यायसंकुलातील आवश्यक सुविधा, सभासद हित आदी मुद्द्यांवर शुक्रवारी दिवसभर पॅनेलप्रमुख, उमेदवारांचा प्रचार रंगला.
बार असोसिएशनची २०१६-१७ या वर्षासाठीची निवडणूक १५ जागांसाठी होत आहे. त्यातील अध्यक्षपदाच्या गटात अ‍ॅड. प्रकाश मोरे, मनोहर बडदरे आणि शिवराम जोशी यांच्यात लढत होत आहे. अध्यक्षपदाच्या संबंधित उमेदवारांनी स्वतंत्रपणे पॅनेलची उभारणी केली आहे. त्याद्वारे त्यांनी अन्य नऊ संचालक पदासाठी २४ जण रिंगणात उतरविले आहेत.
पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळपासून त्यांनी प्रचाराचा वेग वाढविला. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी भर दिला. प्रचारात खंडपीठाची मंजुरी, महसूल न्यायाधीकरण, सहकार न्यायालयाची कोल्हापुरात २२ निर्मिती, न्यायसंकुलातील आवश्यक सुविधा आणि सभासद हित आदी मुद्द्यांवर पॅनेलप्रमुख, उमेदवारांकडून आश्वासने देण्यात आली. निवडणूक लढविणाऱ्या तिन्ही पॅनेलप्रमुखांनी आपली भूमिका जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारनंतर सभासदांसमोर मांडली. दरम्यान, निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असोसिएशनमध्ये मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. सुभाष पिसाळ यांनी दिली. ते म्हणाले, मतदानासाठी १८९२ सभासद पात्र आहेत. एकावेळी १५ जणांना मतदान करता येईल यादृष्टीने नियोजन व तयारी केली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)

पॅनेलप्रमुखांची भूमिका...

खंडपीठासाठी रस्त्यावरील लढाई कायम राहील
खंडपीठासाठीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. खंडपीठासाठी चर्चेची तयारी असून रस्त्यावरची लढाई आम्ही कायम ठेवणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, न्यायसंकुलाच्या नव्या इमारतीमध्ये वकील, पक्षकारांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. या सुविधांसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. न्यायसंकुल परिसरात दोन हजार झाडे मे महिन्याच्या अखेरपर्यंत आम्ही लावणार आहोत.

सनदशीर मार्गाने
प्रश्न सोडविणार
खंडपीठासह विविध मागण्या, प्रश्न सनदशीर मार्गाने सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याबाबतचा लढा प्रभावीपणे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, अ‍ॅड. मनोहर बडदरे यांनी सांगितले. ते म्हणाले, वकिलांसाठी पेन्शन स्कीम, मेडिक्लेम पॉलिसी आदी योजना असोसिएशनमार्फत राबविल्या जातील. त्यासह ई-लायब्ररी, विविध विषयांवरील मार्गदर्शन शिबिरे आदी उपक्रम राबविण्याचा विचार आहे. तालुका आणि जिल्हा बार असोसिएशनमध्ये समन्वय साधण्याची भूमिका आहे. न्यायसंकुलात आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा केला जाईल.

आंदोलनाला गती देणार
काही चुकीच्या घटनांमुळे खंडपीठाबाबतच्या आंदोलनात आपण पाच वर्षांनी मागे आलो आहोत. या आंदोलनाला योग्य गती देण्याचे काम आम्ही करणार आहोत. खंडपीठाची मागणी सत्यात उतरविण्याचे काम आम्ही करू, असे अ‍ॅड. शिवराम जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, न्याय संकुलाच्या नव्या इमारतीत वकील, पक्षकारांसाठीच्या अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यात वाहनांसाठी कव्हर्ड पार्किंग, प्रसाधनगृह, भोजन करण्यासाठीची सुविधा आदींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहील. खंडपीठासाठी आवश्यक असणारे महसूल न्यायाधीकरण, सहकार न्यायालय कोल्हापुरात साकारण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

Web Title: Today's poll for 'District Bar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.