महालक्ष्मी बॅँकेसाठी आज मतदान
By admin | Published: May 22, 2016 12:47 AM2016-05-22T00:47:12+5:302016-05-22T00:47:12+5:30
१७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी को-आॅप. बॅँकेसाठी आज, रविवारी कोल्हापूरसह नृसिंहवाडी व पुणे येथील ३२ केंंद्रांवर मतदान होत आहे. महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेल व महालक्ष्मी पॅनेल यांच्यामध्ये सरळ लढत होत असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत.
महालक्ष्मी बॅँकेसाठी २३७०० मतदार पात्र असून १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष विनोद डिग्रजकर व संचालक महेश धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ‘महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेल,’ तर ज्येष्ठ संचालक भालचंद्र अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘महालक्ष्मी पॅनेल’ यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरसह पुणे, नृसिंहवाडी येथे सभासद असल्याने प्रचार यंत्रणा तिथपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन्ही पॅनेलची दमछाक उडाली.
आज, रविवारी सकाळी आठपासून कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल येथील २९ मतदान केंद्रांबरोबर नृसिंहवाडी येथील दोन, तर पुणे येथील एका केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली.