‘जलयुक्त शिवार’चे आज पोस्टमार्टम
By admin | Published: April 14, 2017 12:09 AM2017-04-14T00:09:09+5:302017-04-14T00:09:09+5:30
पालकमंत्री सांगलीत : कृषी राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती, शेती कनेक्शन्स, बोगस बियाणांचा प्रश्न
सांगली : रखडलेली २२ हजार शेतीपंपांची व घरगुती वीज कनेक्शन, बोगस बियाणे आणि जलयुक्त शिवार योजनेतील निकृष्ट कामे हे मुद्दे शुक्रवारी, १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत गाजण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.
खरीप पेरणी हंगामापूर्वी दरवर्षी एप्रिल महिन्यात तयारीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. मागील आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी, १३ हजार शेतीपंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पिके वाळत असल्याचे सांगून, पैसे भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नसल्याबद्दल नाराजीह व्यक्त केली होती. त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, महिन्यात शेतीपंपांच्या वीज कनेक्शनसाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. अनिल बाबर त्यावेळी उपस्थित होते. त्यामध्येही पैसे उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. पण गेल्या वर्षभरात काहीच निधी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मागील सभेत असणारे प्रश्न जैसे थेच आहेत. सध्या शेतकरी आक्रमक झाले असून, जिल्ह्यातील खासदार, आमदारांकडे कैफियत मांडत आहेत. शिवाय घरगुती ९ हजार कनेक्शन रखडली आहेत.
शुक्रवारी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक होत आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषीपंपांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. बोगस बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. यामुळे वर्षाला एखादी तरी बोगस कंपनी शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालून पसार होत आहे. यावरही ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचा आरोप आहे. अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांकडून कोट्यवधीचा गंडा
शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करूनही त्यांना पैसे न देताच व्यापारी गायब झाले आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस परिसरातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची बाजार समित्यांनी कोणतीही नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. गुन्हे दाखल झाले आहेत. पण, अनेक व्यापाऱ्यांचा शोधच लागला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.