हिटणी येथे कुंभोत्सव अमाप उत्साहात आज कळस मिरवणूक : हत्ती-घोडे खास आकर्षणाचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:44 AM2018-04-21T00:44:23+5:302018-04-21T00:44:23+5:30
गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील जागृत देवस्थान श्री बसवेश्वर मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यानिमित्त सुवासिनींनी काढलेली मंगल कळस मिरवणूक (कुंभोत्सव) अमाप उत्साहात पार पडली. आज, शनिवारी मंदिराच्या सुवर्ण कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीतील हत्ती-घोडे खास आकर्षण ठरले आहे.
सकाळी साडेनऊ वाजता नदीघाटावरील मंदिरापासून कुंभोत्सवाला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावर फिरून दुपारी मंदिराच्या आवारात मिरवणुकीची सांगता झाली. सजविलेल्या खास वाहनातून श्री प्रभूलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि अभिनव वप्पतेश्वर महास्वामी हेही कुंभोत्सवात सहभागी झाले होते.
कुंभोत्सवानिमित्त मिरवणूक मार्गासह प्रत्येक गल्लीत दारोदारी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. कुंभोत्सवात सहभागी महिलांना ठिकठिकाणी सरबत वाटण्यात आले. फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत होत्या. तब्बल तीन तासांनंतर मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसाद झाला.
आज, शनिवारी मंदिराच्या सुवर्ण कळसाची मिरवणूक, रविवारी कळसपूजा व महारुद्राभिषेक आणि त्यांनतर श्रीशैल मठाचे जगद्गुरूडॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांची गावातून सवाद्य मिरवणूक होईल. सोमवारी दुपारी कलशारोहण होईल.
गावकऱ्यांची एकजूट, माहेरवाशिणी दाखल
आपापसातील सर्व मतभेद विसरून सर्व गावकरी या सोहळ्यात मनापासून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे सर्व माहेरवाशिणीदेखील ऐतिहासिक सोहळ्यासाठी आवर्जून ‘माहेर हिटणी’त दाखल झाल्या आहेत.