अपंगांना व्हेईकलद्वारे गतिमान करणाऱ्या ‘बबन’चा आज गौरव
By admin | Published: December 5, 2015 12:54 AM2015-12-05T00:54:17+5:302015-12-05T00:54:28+5:30
महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही मागणी : साडेतीन हजारांहून अधिक हँडिकॅप व्हेईकलची निर्मिती
कोल्हापूर : पोलिओमुळे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दोन्ही पायांना अपंगत्व आलेल्या बबन साताप्पा सुतार यांनी अपंगत्वामुळे न डगमगता आयुष्याच्या प्रवासाची घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. स्वत: कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा अपंगांसाठी सोईस्कर अशा ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांनाही येऊ नयेत, म्हणून मागणीनुसार साडेतीन हजार गाड्या बनवून दिल्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘स्वर्गीय एच. आर. कोहली प्रेरणा पुरस्कार’ देऊन आज गौरव होत आहे.
बबन सुतार दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून वडिलांना कामात मदत करु लागले. वडिलांच्या कामाचा व्याप वाढत गेला. त्यात अपंगत्वामुळे धावपळीचे काम ‘बबन’ला जमेना. त्यामुळे वडिलांनी तुला कायनेटिकची अपंगांसाठीची चारचाकांची दुचाकी घेऊ म्हणून डिलरकडे नेले. तिथे या गाड्यांसाठी सहा महिन्याची प्रतीक्षा यादी होती. त्यामुळे बबनची निराशा झाली. आपण नेहमीची कायनेटिक गाडी घेऊ आणि त्याला जादाची चाके लावू, असा विश्वास वडिलांना विचार करून दिला. त्यातून गाडी खरेदी करून त्यात अपंगांसाठी सोईस्कर ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. त्यामुळे बबनला काम करण्यासाठी हे आणखी मोठे बळ मिळाले. पुढे वडिलांच्या निधनानंतर आई मालूबाई यांनी आधार दिला.
वडिलांच्या हाताखाली काम करत त्यांनी नेहरूनगर येथे खत्री लॉनलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये आपले सुतारकाम व फॅब्रिकेशन सुरू केले. कामासाठी इतर ठिकाणी फिरताना गाडी कुठे व कोणी केली, याची माहिती अनेक अपंगमित्र बबन यांच्याकडून घेऊ लागले. होय-नाही करत एका गाडीची निर्मिती केली. ही गाडी पसंतीसही उतरली. मग हळू-हळू कोल्हापूरसह राज्यभरातून अनेक अपंग मित्रांची अशा प्रकारच्या गाडी बनविण्यासाठी चौकशी होऊ लागली. त्यात बजाज, होंडा आदी मोटारसायकल घेऊन त्याला जादाची दोन चाके बसवून सोईस्कर ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. एक-एक म्हणता म्हणता साडेतीन हजार गाड्यांना अशी सोय बबन यांनी करून दिली.
महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही गाडीसाठी मागणी येऊ लागली आहे. या कार्याची दखल घेऊन एच. आर. कोहली प्रेरणा पुरस्काराने त्यांचा आज, शनिवारी गौरव करण्यात येणार आहे. बबन यांच्यासह संजय पोवार यांच्या ‘बेस्ट सर्पोट फोर डिसेबल्ड पुरस्कारा’ने, तर उज्ज्वला चव्हाण यांचा ‘पॅरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
चारचाकीसाठी किट तयार करण्याचे प्रयत्न
अपंगांची अधिक सोय व्हावी, म्हणून मोटारसायकलला हँड गिअर बसवून दिले. जिवलग मित्र युनूस शेख यांच्या प्रेरणेने चारचाकी गाडीही अपंगांना चालवायला येईल, असे किट तयार करण्याचा प्रयत्न बबन यांनी सुरू केला आहे. बबन यांच्या प्रयत्नांमुळे हजारो अपंगांना वाहनरूपी पंख मिळाल्यामुळे स्वत:च्या पायावर उभारण्याचे बळ मिळाले. त्यातून दुसऱ्याच्या आधाराशिवाय काही करू न शकणारे अपंगमित्रही या गाडीचा वापर करून आपली नित्य कामेही करू लागली. मागणी वाढत कधी हजारोंचा आकडा पार करून गेला हे बबन यांना कळालेही नाही.