डॉल्बीविरोधात आज मूकमोर्चा-- कोल्हापूरकर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:51 AM2017-09-02T00:51:49+5:302017-09-02T00:51:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शांतताप्रिय नागरिकांच्यावतीने आज, शनिवारी सकाळी १० वाजता मिरजकर तिकटी येथून डॉल्बी विरोधात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाची विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित करण्याचा विडा उचलला आहे. त्यास काही विघ्नसंतोषी घटक संकुचित राजकीय फायद्याचा विचार करून विरोध करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ‘डॉल्बी नकोच’ ही कोल्हापूरची जनभावना असल्याचे दाखविण्यासाठी ही फेरी काढण्यात येत असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.
मिरजकर तिकटीपासून सुरू होणारा हा मोर्चाची शिवाजी चौकात सांगता होईल. या मोर्चामध्ये सहभागी तरुणी डॉल्बी दुष्परिणामांची माहिती देतील. या मूकमोर्चामध्ये समाजातील मान्यवर, डॉक्टर, वकील, तालीम संस्था, रिक्षा संघटना, महिला संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी, उद्योजक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, शाळा-कॉलेज विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. हा मोर्चा अराजकीय आहे. ज्या-ज्या घटकांना डॉल्बी नको असे वाटते त्यांनी यात सहभागी होऊन कोल्हापूरची विधायक ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले आहे.
एकतेची ताकद, आवाजापेक्षा मोठी
‘डॉल्बी नको, डॉल्बी मुक्त कोल्हापूर’साठी शनिवारी सकाळी मिरजकर तिकटी ते शिवाजी पुतळा अशी मूक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या समर्थनात शुक्रवारी दिवसभर शहरात ‘एकतेची ताकद, आवाजापेक्षा मोठी’ अशाप्रकारची पत्रके वाटण्यात आली. या पत्रकात आपल्या शहराचा नावलौकीक टिकविण्यासाठी पुढे येऊ या गणेशोत्सव काळात डॉल्बी लावू नये ही प्रशासनाने घेतलेली भूमिका योग्य आहे. असे वाटत असले तर चला, आपलं कोल्हापूर आपलं आहे. डॉल्बीपासून मुक्ती ‘या मोहिमेला साथ देऊया. संघटित होऊन शिस्तबद्ध रॅली काढूया’ असे आवाहन करण्यात आले.