Kolhapur: शाळेत खेळताना सापावर पाय पडला, भीतीने ताप भरला अन् चिमुकल्याचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:11 PM2023-09-18T16:11:43+5:302023-09-18T16:16:58+5:30
वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती
कोपार्डे : वाकरे येथे चार दिवसांपूर्वी शाळेच्या आवारात खेळताना सापावर लहान मुलाचा पाय पडला. यामुळे भीतीने त्याला ताप भरला. तापाने मेंदूवर परिणाम झाल्याने रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) असे त्याचे नाव आहे.
मिळालेली माहिती अशी, अर्णव हा गावातील खासगी इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शाळेच्या आवारात खेळताना त्याचा सापावर पाय पडला. घरी आई-वडिलांना त्याने याची कल्पना दिली. त्याच्या शरीरावर व पायावर ओरखडाही नव्हता. यामुळे नातेवाइकांनी नि:श्वास सोडला; पण सापावर पडलेल्या पायामुळे तो भीतीने अस्वस्थ झाल्याने ताप भरू लागला होता. यामुळे त्याला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले.
पण सर्पदंशाचे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसले तरी त्याचा ताप कमी होत नसल्याने नातेवाइकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण तो अत्यवस्थेत गेला. रविवारी उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाशी संबंधित या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती.
कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ
शेतात फुले तोडत असताना सर्पदंश झाला आणि काय चावले हे कळेपर्यंत बाजीराव पांडुरंग चौगले (वय ४८) यांना मृत्यूने गाठले. दूध व्यवसायाबरोबर फुलाची शेती असल्याने ते सकाळी लवकर फुले तोडण्यासाठी शेतात जात होते. गुरुवारी फुले तोडत असताना काहीतरी टोचल्यासारखे झाले. किडी किंवा तार टाेचली असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत फुले तोडली. अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या खाऊन ते झोपले. त्याच ठिकाणी ते बेशुद्ध पडले, सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.