कागलात मंडलिक-मुश्रीफ पुन्हा एकत्र
By admin | Published: March 14, 2017 01:32 AM2017-03-14T01:32:58+5:302017-03-14T01:32:58+5:30
लोकसभेचे राजकारण; निमित्त पंचायत समितीचे; कमल पाटील होणार सभापती?
कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकारणात सोमवारी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे एकत्र आले. कागल पंचायत समितीच्या सत्तेच्या निमित्ताने या दोन नेत्यांत एकी झाली असली तरी तिला आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे संदर्भ आहेत.
‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात अशा घडामोडी सुरू असल्याचे वृत्त दिले होते. त्यास त्यावेळी माजी आमदार संजय घाटगे गटाने तीव्र हरकत घेतली होती, परंतु या निर्णयानंतर आता त्यांच्या गटाच्या राजकारणाची दिशा आणि भवितव्य काय हा प्रश्न उरला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कागलमध्ये राष्ट्रवादीला तीन व शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. पंचायत समितीत मात्र राष्ट्रवादीला पाच व शिवसेनेला पाच जागा मिळाल्या. त्यात मंडलिक गटाचे चार व संजय घाटगे गटाचा एक सदस्य आहे. समान बलाबल असल्यामुळे चिठ्ठ्या टाकून निर्णय होणार होता, परंतु तसे न करता हे दोन्ही पक्ष एकत्र आले. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींचाही त्यास संदर्भ आहे. त्यांनी पदांची वाटणी केली व त्यामध्ये पहिले सव्वा वर्ष मंडलिक गटाला सभापतिपद व दुसऱ्या सव्वा वर्षात मुश्रीफ गटाला सभापतिपद देण्याचा निर्णय झाला. या घडामोडींना संजय घाटगे यांनीही संमती दिली आहे.
ही वरकरणी पंचायत समितीतील सत्तेसाठी आघाडी असली, तरी तिच्यामागे लोकसभेचे राजकारण आहे. मंडलिक व मुश्रीफ हे दोन्ही गट एकत्र आले तर एकटा कागल तालुका मंडलिक यांना किमान ५५ हजारांचे मताधिक्य देऊ शकतो. सोमवारी तशी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांतही चर्चा होती. जिल्हा परिषदेतही मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व पी. एन. पाटील हे एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी मुश्रीफ यांचे पटत नाही. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर त्यांनी महाडिक यांना तुम्ही पक्षात राहणार आहे की नाही हे एकदा स्पष्ट करावे, असे उघडपणे बजावले होते.
महाडिक यांनी त्यास सौम्य प्रत्युत्तर दिले असले, तरी त्यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. महाडिक हे २०१९ च्या निवडणुकीत भाजपचेच उमेदवार असतील अशा हालचाली आहेत. उत्तर प्रदेशचा निकाल व भाजपची एकूण वाटचाल पाहता या हालचालींना बळच मिळत आहे. अशा स्थितीत मंडलिक हे त्यांचे विरोधी उमेदवार असतील. त्यांचा पक्ष कोणता असेल हे नंतर ठरेल, परंतु या राजकारणाची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचेच सोमवारी स्पष्ट झाले.
कमल पाटील सभापती..
मंडलिक गटाकडून सेनापती कापशी पंचायत समिती मतदार संघातून विजयी झालेल्या कमल रघुनाथ पाटील (रा. बाळेघोल) यांना सभापती पदाची संधी मिळू शकते. रघुनाथ पाटील हे मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पंचायत समितीच्या प्रचारातही कमल पाटील यांचे नांव भावी सभापती म्हणून पुढे आले होते.
संजय मंडलिक यांनी आमदार मुश्रीफ यांच्याशी सभापतीपदाबाबत चर्चा करताना माझ्याशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेला सभापतिपदाची संधी मिळणार आहे. ही आघाडी दोन गटांमध्ये नव्हे, तर दोन पक्षांमध्ये झाली आहे.
- संजय घाटगे, माजी आमदार