शौचालय अनुदान घोटाळा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:29+5:302020-12-23T04:21:29+5:30
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळ्याचा अहवाल मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना सादर ...
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळ्याचा अहवाल मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना सादर करण्यात आला आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या अहवालातील वस्तुस्थितीची माहिती नंतरच मिळणार आहे.
या अनुदान घोटाळ्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने ‘स्वाभिमानी’चे पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा यांनी अर्धनग्न अवस्थेत ११ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाचीही झाली होती. अखेर २१ डिसेंबर २०२० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर जनगोंडा यांनी आंदोलन मागे घेतले.
यानंतर शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रकल्प संचालक डाॅ. रवी शिवदास यांनी दिले होते. त्यानुसार मित्तल यांना हा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र या अहवालात नेमकी काय शिफारस करण्यात आली आहे, याची माहिती आचारसंहितेनंतर मिळणार आहे.