आकांक्षी योजना: कोल्हापूरसह ३८ शहरांमध्ये ४२ कोटींची शौचालये, मुताऱ्या
By समीर देशपांडे | Published: September 2, 2023 12:59 PM2023-09-02T12:59:14+5:302023-09-02T12:59:55+5:30
राज्य उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली
समीर देशपांडे
कोल्हापूर: स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नागरी २.० अंतर्गत राज्यातील ३८ महापालिका, नगरपालिकांमध्ये तब्बल ४२ कोटी रुपये खर्चून शौचालये आणि मुताऱ्या उभारण्यात येणार आहेत. राज्य उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्येही अभियान सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत महापालिका आणि नगरपालिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ५ जुलै २०२३ रोजीच्या उच्चाधिकारी समितीच्या पाचव्या बैठकीत हे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने पुणे, चंद्रपूर, शेगाव, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली या शहरांचा समावेश आहे; तसेच जेजुरी, अक्कलकोट, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर, माहूर, वाई, पन्हाळा, तुळजापूर, माणगाव, लोणार, लोणावळा, सावंतवाडी, रामटेक, पाचगणी, पंढरपूर, सिंदखेडराजा या धार्मिक आणि पर्यटन शहरांचाही यामध्ये समावेश आहे.
या ३८ शहरांमध्ये एकूण १०६८ शौचालयांच्या सीट उभारण्यात येणार असून ४४९ मुतारीची भांडी बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ४१ कोटी ८४ लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी १० कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये केंद्र शासन देणार असून ११ कोटी ७१ लाख रुपये राज्य शासन देणार आहे. तर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ५ कोटी ५७ लाख रुपये भरावे लागणार आहेत.
शौचालयांवर जाहिराती
आकांक्षी शौचालयांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातून भरून काढावा अशी शासनाची अपेक्षा आहे. यासाठी शौचालयाच्या भिंतीवर जाहिराती घेण्यापासून, ई-वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, व्यावसायिक दुकानांना त्या ठिकाणी जागा देणे, व्यायामशाळा, वाचनालय उभारून यातून निधी संकलित करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.