अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:37+5:302021-06-29T04:17:37+5:30
कोल्हापूर : सम्राटनगर येथील नाल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामप्रश्नी येथील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजारामपुरीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगररचनाकार ...
कोल्हापूर : सम्राटनगर येथील नाल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामप्रश्नी येथील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजारामपुरीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगररचनाकार रा. सी. महाजन यांना चांगलेच धारेवर धरले. अतिक्रमण काढण्यास विलंब होत असल्याप्रकरणी त्यांना विविध प्रश्नाची सरबत्ती करण्यात आली.
सम्राटनगरातील नाल्यात अतिक्रमण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी आजूबाजूच्या घरात जात आहे. परिणामी आम आदमीतर्फे अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. गेल्या महिन्यात नाल्यात उतरून अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी जागेवर भेट देऊन संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. त्यास दोन आठवडे उलटूनदेखील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नाही. यामुळे आपच्या शिष्टमंडळातर्फे महाजन यांना जाब विचारण्यात आला. या वेळी उद्या आदेश होऊन अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाले नाही, तर बुधवारी कार्यालयात सगळा संसार घेऊन रहिवासी ठिय्या मांडतील आणि जोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.
या वेळी युवा अध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर युवा अध्यक्ष मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, पवन भांबुरे, विशाल वठारे, राज कोरगावकर आदी उपस्थित होते.
फोटो : २८०६२०२१-कोल- आप भेट
कोल्हापुरातील राजारामपुरीतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगररचनाकार रा. सी. महाजन यांना आपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.