ऑनलाइन अधिवेशनावरून चंद्रकांत पाटील, सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:21+5:302021-06-27T04:16:21+5:30
कोल्हापूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑनलाइन घ्या, म्हणजे आम्हाला प्रश्न विचारता येईल आणि तुम्हाला उत्तरही देता येईल, अशी ...
कोल्हापूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑनलाइन घ्या, म्हणजे आम्हाला प्रश्न विचारता येईल आणि तुम्हाला उत्तरही देता येईल, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यावर ऑनलाइनमुळे अधिकच गोंधळ होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता संसर्ग, लॉकडाऊन आणि पावसाळी अधिवेशन यावर चर्चा होत असताना एकमेकांचे हळुवार चिमटे काढण्यासही ते विसरले नाहीत.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी लक्ष्मीविलास पॅलेस येथे चंद्रकांत पाटील, सतेज पाटील व हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील नेते एकत्र आले होते. खासदार संभाजीराजे यायचे होते, म्हणून सर्वजण गप्पा मारण्यात मग्न होते. एरव्ही चंद्रकांत पाटील व हसन मुश्रीफ हे एकमेकांचे वाभाडे काढत असतात. मात्र, ते एकत्र आल्याने येथे काहीतरी टोलेबाजी होणार, हे निश्चित होते. एकमेकांशी चर्चा करीत असताना काेरोनाचा वाढता संसर्ग, लॉकडाऊन व पावसाळी अधिवेशन यावर हळूच चिमटे काढण्यासही ते विसरले नाहीत.
चंद्रकांत पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात कोरोना, लॉकडाऊन याबाबत चर्चा सुरू झाल्यावर शहर व जिल्ह्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतरच सर्व व्यवहार खुले करावे लागतील. निर्बंधास व्यापारी, व्यावसायिक वैतागले असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. या चर्चेतच चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने ऑनलाइन पावसाळी अधिवेशन घ्यावे, असे सूचित केले. यामुळे विरोधकांना प्रश्न विचारता येईल आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरही देता येईल, असा चिमटा काढला. यावर अशा प्रकारचे अधिवेशन घेतल्यास नियंत्रण ठेवणे अडचणीचे होईल, असे प्रत्युत्तर देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी विषयाला पूर्णविराम दिला. सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा रंगली असतानाच खासदार संभाजीराजे यांचे आगमन झाले. सर्वांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.