टोल आंदोलनातून पानसरेंंच्या हत्येचा संशय
By admin | Published: September 24, 2016 12:56 AM2016-09-24T00:56:41+5:302016-09-24T00:56:41+5:30
चौकशीची मागणी : हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या टोल आंदोलन प्रकरणातून झाली आहे का, याची चौकशी करावी, सनातन संस्था व साधकांना अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निरीक्षक अमृत देशमुख, कॉन्स्टेबल रवी पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करून त्रास दिला आहे. त्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना शुक्रवारी दिले. त्यावर देशपांडे यांनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशी अधिकारी नियुक्ती करून तपास केला जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे, सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ रोजी संशयित म्हणून अटक केली. त्याला एक वर्षाचा कालावधी झाला. डिसेंबर २०१५ मध्ये आरोपपत्र दाखल करूनही मे २०१६ पर्यंत खटला चालविण्याची पोलिसांची सिद्धता नव्हती. समीरप्रमाणे डॉ. तावडेंनाही अनेक दिवस कारावासात खितपत ठेवण्याचा खटाटोप चालू आहे. खरे आरोपी सापडत नाहीत म्हणून या दोघांचा बळी दिला जात आहे. डॉ. तावडेंचा ताबा घेण्यापासून प्रत्येक नियमबाह्य कृतीला मुख्य तपास अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा हेच कारणीभूत आहेत. त्यांनी पनवेल येथील आश्रमात छापा टाकून महिला साधकांचा छळ केला आहे.
टोल आंदोलनात कॉ. पानसरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांचे कामगार नेते म्हणून कार्य असल्याने विविध भांडवलदारी लोकांशी त्यांचे वैर असू शकते, यातील कोणत्याही शक्यतेकडे न पाहता केवळ ‘सनातन’ला लक्ष केले जात आहे. डॉ. तावडे यांना वकिलांना भेटू न देणे, पोलिस कोठडीत मारहाण करणे, नामजप माळ काढून घेणे, पनवेल येथील आश्रमात शेड्युल्ड एच आणि एच-१ ही औषधे जप्त करून नार्कोटिक ड्रग्ज सापडल्याचा कांगावा केला. यावरूनच तपास यंत्रणेचा ‘सनातन’ला बदनाम करण्याचा उद्देश स्पष्ट होतो. निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, मनोज खाडे, मधुकर नाझरे, किशोर घाटगे, राजू यादव, संजय कुलकर्णी, शरद माळी, शिवाजीराव ससे, राजेंद्र मेथे, राजमोहन स्वामी, आनंदा पाटील, सदाशिव पोवार, बाबासाहेब भोसले, सचिन पाटील, भरत मोरे, यशोदा मोरे, दिलीप कोळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)