कोल्हापुरचा टोल लढा हा विकृत भांडवलशाहीवरील विजय - विश्वभंर चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:18 PM2018-01-21T20:18:17+5:302018-01-21T20:18:39+5:30
कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे असे मत विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
कोल्हापूर - कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे असे मत विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
येथील राजर्षि शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी संध्याकाळी शानदार समारंभामध्ये डॉ. चौधरी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतजज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते.श्रमिक प्रतिष्ठान व कोल्हापूर शहर जिल्हा टोलविरोधी कृती समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील, निमंत्रक निवास साळोखे,टोलचा न्यायालयीन लढा लढणारे अॅड. अभय नेवगी आणि तांत्रिक घोटाळा उघडकीस आणणारे आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
‘जनआंदोलनांचे भवितव्य काय?’ या विषयावर मांडणी करताना चौधरी पुढे म्हणाले, कोल्हापूरने जो संघर्ष उभारला तसा संघर्ष पुण्या मुंबईत उभारणार नाही. हे सामूहिक कर्तृत्व कालांतराने विस्मरणात जाते. मात्र त्याचे उत्तम शब्दांकन करण्याचे काम विश्वास पाटील यांनी केल्याने पुढच्या पीढीसाठी ते दिशादर्शक ठरणार आहे. इथे आयआरबी कंपनी, अधिकारी आणि मंत्री यांची युती असतानाही लोक जिंकले हे या लढ्याचे वैशिष्ट्य आहे.
संसदेमध्ये सामान्यांचे ऐकले जात नाही.ते ऐकू जाईपर्यंत रस्त्यावरचे हे लढे अपरिहार्य ठरतात. मुळात भारतात आंदोलने अधिक संख्येने होण्याचे कारण हे सदोष विकास प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया सर्वसमावेशक होण्याची गरज आहे. रत्नागिरीसारख्या एका जिल्ह्यात ४0 थर्मल पॉवर प्लान्ट उभारले जातात. याची चर्चा व्हायला हवी. मात्र जमीनीचे भाव पटले की प्रकल्प सुरू झाला हे बंद व्हायला हवे. समृध्दी महामार्गात नेते, आएएस अधिकाºयांनी आधी जमीनी घेऊन नंतर त्या शासनाला विकून टाकल्या. नियोजन हे टेंडरकेंद्री झाल्याने हा सर्व घोटाळा होत असून विश्वासार्हता नसलेले लोक आमच्या विकासाचे नियोजन करतात हे वास्तव आहे.
आर्थिक विषमता हा सर्वात कळीचा मुददा असून भीक मागण्यासाठी भिकारी तुमच्या गाडीच्या काचेवर टकटक करत आहे. परंतू ती भूक जेव्हा आणखी असह्य होईल तेव्हा तुमच्या गाड्यांच्या काचा फोडून ते आत घुसायला मागे पुढे पाहणार नाहीत. यातून मध्यमवर्ग, अंबानी आणि अदानीही शिल्लक राहणार नाही असा इशारा यावेळी चौधरी यांनी दिला. एकूणच राजकीय आणि प्रशासकीय धोरणांचे वाभाडे काढताना चौधरी यांनी प्रस्थापितांना अनेक चिमटेही काढले. ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
लोकांना विश्वासात न घेता कोल्हापुरात हा प्रकल्प राबवण्यात आला. त्या अन्यायाविरोधात जनता रस्त्यावर उतरली. या लढयाचे नेमके शब्दांकन करावे अशी जबाबदार कॉ. गोविंद पानसरे यांनी माझ्यावर सोपवली. काम करून घेतल्यानंतर कोल्हापूरकरांनी पैसे बुडवले अशी एक प्रतिमा तयार करण्यात आली होती. ती पुसून टाकण्यासाठी आणि सामान्य कोल्हापूरकर काय करू शकतो हे सिध्द केलेल्या लढ्याचा दस्ताऐवज व्हावा या हेतूने हे पुस्तक लिहल्याचे लेखक विश्वास पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, अनेक क्रांत्या या कराला विरोध दर्शवण्यासाठीच झाल्या असून लोकलढा कसा असावा याचे उत्तम प्रारूप कोल्हापूरच्या टोललढयाने समोर ठेवले आहे. उमेश सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले तर ‘श्रमिक’चे एस. बी. पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रा. संजय मंडलिक, निवृत्त सहकार अतिरिक्त आयुक्त, उमा पानसरे, मेघा पानसरे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, डॉ. मधुकर बाचूळकर, अॅड. महादेव आडगुळे, कॉ. दिलीप पवार, संजय मंडलिक, आर के पोवार, अशोक पोवार, बाबा पार्टे, डॉ. धनंजय गुंडे,अॅड. शिवाजीराव राणे, शाहीर राजू राऊत, दलीतमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा ओमप्रकाश कलमे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील, बाबासाहेब देवकर, प्रा साधना झाडबुके, श्रीमती कैलाश नेवगी, उदय गायकवाड, अनिल चौगुले, शाहू कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक विजय औताडे, पी जी मेढे, प्रा मारुतराव मोहिते, निवृत्त डीवायएसपी सुरेश पवार, " सकाळ" वृत्त समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, सहसंपादक संजय पाटोळे, मटा चे संपादक विजय जाधव, लोकमतचे वृत्त संपादक चंद्रकांत कित्तूरे, तरुण भारत चे निवासी संपादक जयसिंग पाटील, जेष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, शरद कारखानीस, दशरथ पारेकर, डॉ सुनील पाटील, प्राचार्य महादेव नरके, प्रा साधना झाडबुके, अनुराधा भोसले, सांगली जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा विश्वास पाटील, महिला बालकल्याण विभागाचे निवृत्त उपायुक्त एम डी पाटील, आर्किटेक सुधीर राऊत, जीवन बोडके,भारती मुद्रणालयचे निहाल शिपुरकर, डॉ मंजुश्री पवार, आरपीआयचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गवई गटाचे अध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, कवाडे गटाचे दगडू भास्कर, सतीशचंद्र कांबळे, सतीश पाटील, अंनिस च्या सीमा पाटील, माकपचे चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, श्रीकांत भोसले, मिलिंद यादव, नामदेव कांबळे यांच्यासह वृत्तपत्र व समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले.
व्यासपीठाची अनुरूप रचना
शाहू स्मारक भवनच्या प्रवेशव्दारावर युनाते क्रियशन च्या कलाकारांनी डांबरी रस्त्याचा फ्लेक्स करून खाली अंथरला होता तर त्याआधी टोलची कमान उभारण्यात आली होती. तर व्यासपीठावर टोल वसुलीसाठी आडव्या टाकल्या जाणाºया बारची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या रचनेचे उपस्थितांनी कौतुक केले.