टोल वाढला पाच ते दहा रुपयांनी
By Admin | Published: March 31, 2015 12:50 AM2015-03-31T00:50:32+5:302015-03-31T00:56:45+5:30
आज मध्यरात्रीपासून अंमल : नवा दर तीन वर्षांसाठी
कोल्हापूर : आयआरबी कोल्हापूर इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट कंपनीने कोल्हापूर शहरातील टोल वसुलीसाठीचे नवे दरपत्रक सोमवारी जाहीर केले. पाच ते दहा रुपयांपर्यंत होणारी ही दरवाढ आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून अमलात येणार आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत हे दर लागू राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.यापूर्वी कार व जीपसाठी आकारण्यात येणाऱ्या २० रुपयांच्या दरात काहीही बदल केलेला नाही. मिनी बस व तत्सम वाहनांसाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये आकारले जाणार आहेत. ट्रक व बससाठी ४० ऐवजी ५० रुपये, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी ५५ रुपयांवरून ६० रुपये अशी वाढ केली जाणार आहे. पथकरात आगाऊ कुपन्सवर २५ ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. लष्करी वाहने व शासकीय दिव्यांची वाहने, दुचाकी, तीनचाकी वाहने, रिकामे ट्रॅक्टर्स, महापालिका व टपाल खात्याची वाहने यांना पूर्वीप्रमाणेच टोलमध्ये सवलत राहणार आहे. शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांवर नवीन दराप्रमाणे वसुली केली जाणार आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)