तोल...मोल के ‘झोल’
By admin | Published: March 25, 2015 10:53 PM2015-03-25T22:53:01+5:302015-03-26T00:06:55+5:30
एक मिलिग्रॅम काट्यांची सक्ती : सराफ व्यावसायिकांचा आक्षेप
इंदुमती गणेश - कोल्हापूर -सोने-चांदी, खडे यांसारख्या मौल्यवान दागिने खरेदी-विक्रीसाठी शासनाने १ एप्रिलपासून सक्ती केलेल्या १ मिलिगॅ्रम काट्यांवर सराफ व्यावसायिकांचा आक्षेप आहे. मात्र, सध्या वापरातील १० मिलिग्रॅमचे काटे व यात नसलेली पारदर्शकता यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे वापरणे अपरिहार्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सोने-चांदी व मौल्यवान धातू तसेच खडे यांच्या व्यवहारांत ग्राहकांची फसवणूक होत असल्याची शक्यता काही अशासकीय सदस्यांनी व्यक्त केली होती. त्यावर विचार करून वैधमापनशास्त्र तरतुदीनुसार शासनाने २४ फेब्रुवारी रोजी एक मिलिग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश काढले आहेत. त्याला सराफ व्यावसायिकांमधून विरोध आहे. सध्या सोने-चांदी तसेच मौल्यवान धातू व खडे यांच्या खरेदी-विक्रीसाठी सराफ व्यावसायिकांकडून १० मिलिगॅ्रमच्या वजनाचे इलेक्ट्रॉनिक्स काटे वापरले जातात. मात्र, वजन करताना त्यात काही मिलिगॅ्रमपर्यंतचा फरक पडतो. बऱ्याचदा ग्राहकांचा त्यात तोटा होतो. हे टाळण्यासाठी शासनाने एक मिलिगॅ्रम अचूकतेचे इलेक्ट्रॉनिक्स काटे वापरणे बंधनकारक केले आहे. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
एक मिलिगॅ्रमचा वजनकाटा हा खूप संवेदनशील असतो. त्याला हवासुद्धा लागू नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. तो काटा स्थिर राहत नसल्याने उलट ग्राहकांना आपल्याला व्यावसायिक फसवताहेत की काय, असे वाटण्याची शक्यता आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोन्याचे दर आता इतके वाढले आहे की, गुंजभर फरक पडला तरी ग्राहकाला तीनशे-चारशे रुपयांचा फटका बसतो. त्यामुळे सोने-चांदीच्या वजनात अचूकता असलीच पाहिजे. वजनकाटे महाग असल्याचे सराफ व्यावसायिक म्हणत आहेत. पण ते काही खरे नाही. ग्राहक कित्येक वर्षे नुकसान सोसत आहेत त्याचे काय?
- संजय हुक्केरी, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
सोन्या-चांदीची खरेदी ही नेहमीच खर्चिक गुंतवणूक असते. आम्ही खरेदी करीत असलेल्या अलंकारांचे अधिक अचूकतेने वजन केले जात असेल तर ती खूपच चांगली सोय आहे. शिवाय सोने योग्य वजनाचे आहे की नाही, याची काळजी राहणार नाही.
- अनिता सूर्यवंशी, ग्राहक
सराफ व्यावसायिक पेढीच्या लौकिकाचा प्रश्न असल्याने ग्राहकांना कधीच फसवीत नाही. उलट सरकार मात्र नेहमी सराफांना नवीन नियम लादून त्रास देत असते. आम्ही या सक्तीला विरोध करणार आहोत.
- सुरेश गायकवाड, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघ
१ मिलिगॅ्रम काट्याचा फायदा काय?
सध्या सराफ व्यावसायिकांकडून वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक काटे हे १० मिलिगॅ्रमनुसार आहेत. समजा, एखादा दागिना १ ग्रॅम, ३ किंवा ४ मिलिगॅ्रमचा असेल तर काटा ते दाखवीत नाही. त्यावेळी ग्राहकाला त्याची विक्री करताना व्यावसायिकाला जवळपास १० ते १५ रुपयांपर्यंत तोटा होतो. त्याचप्रमाणे दागिना पाच मिलिगॅ्रमपेक्षा जास्त पण दहा मिलिगॅ्रमपेक्षा कमी असेल तर खरेदी करताना ग्राहकाला तेवढ्याच रकमेचे नुकसान होते; पण सराफ व्यावसायिक तोट्याचा धंदा कधीच करीत नाहीत; त्यामुळे ग्राहकांचेच नुकसान होते.
घट, तूट आणि लूट
कोणतेही अलंकार चोख सोन्यापासून तयार होत नाहीत. त्यासाठी त्यात काही अन्य धातू मिसळावे लागतात. मात्र, सराफ त्या धातूलाही सोन्याचा दर लावतात. त्यातून अन्य धातूचे वजन वजा केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्तीचा भुर्दंड बसतो. दागिना खरेदी केल्यानंतर अगदी पंधरा-वीस दिवसांनंतर परत द्यायला गेलात तरी त्यात १५ टक्के घट किंवा तूट धरली जाते. पूर्वी दागिने हातांनी बनविले जायचे. आता ते मशीनवर होतात. त्यामुळे तुलनेने घडणावळीचा खर्च कमी येतो. अनेकदा ग्राहक तयार दागिने घेतात; त्यावरही मजुरी लावली जाते.