टोलवसुलीचे काम निविघ्नपणे सुरू
By admin | Published: June 18, 2014 12:55 AM2014-06-18T00:55:30+5:302014-06-18T00:55:40+5:30
कोल्हापूरकर टोल न देण्यावर ठाम
कोल्हापूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. आंदोलन करायचेच असेल तर ते कायद्याच्या अधिपत्याखाली करावे, या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी टोलनाक्यावर जाण्याचे टाळल्यामुळे आयआरबीची टोलवसुली आज, मंगळवारी काहीशी सुरळीत झाली. तथापि, टोल न देण्यावर वाहनधारक ठाम असल्याने टोलला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, टोलविरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगत कृती समितीच्या नेत्यांनी कोणीही वाहनधारकाने टोल देऊ नये, असे आवाहन केले आहे.
शहरातील सर्वच म्हणजे नऊ नाक्यांवर आज, मंगळवारी दिवसभर टोलवसुली सुरू होती; परंतु अनेक वाहनधारक नाक्यावर जाताच ‘आम्ही टोल देणार नाही’ असे बिनदिक्कतपणे ठणकावून सांगत होते. आयआरबीचे कर्मचारी नाक्यावर वाहने अडवीत होते. वाहनधारकांकडे टोलची मागणी करीत होते. थोडावेळ वाहने नाक्यावर थांबवली जात होती; पण वाहनधारक टोल देणार नाहीच, असे सांगत होते. शेवटी कर्मचारीही कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची दक्षता घेत, थोड्या वेळाने वाहनांना जाऊ देत होते.
कृती समितीने टोल देऊ नये असे आवाहन केले आहे. वाहनधारकही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात टोलनाक्यांवर कोठेही वादावादी झाल्याचे वृत्त नाही.