Kolhapur: सहापदरीकरणाचा घोळ, कसला घेताय टोल; जीव मुठीत धरुन करावा लागतो प्रवास

By समीर देशपांडे | Published: June 20, 2024 04:25 PM2024-06-20T16:25:15+5:302024-06-20T16:25:53+5:30

अपूर्ण कामे आणि दुसरीकडे ३६० रुपयांचा टोल यामुळे नागरिक हैराण

Toll waiver is required till completion of six-lane construction of Kagal Pune National Highway | Kolhapur: सहापदरीकरणाचा घोळ, कसला घेताय टोल; जीव मुठीत धरुन करावा लागतो प्रवास

Kolhapur: सहापदरीकरणाचा घोळ, कसला घेताय टोल; जीव मुठीत धरुन करावा लागतो प्रवास

समीर देशपांडे

कोल्हापूर : हजारो प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कागल पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पंचनामा गेले पाच दिवस ‘लोकमत’च्या माध्यमातून सुरू आहे. एकीकडे अपूर्ण कामे आणि दुसरीकडे ३६० रुपयांचा टोल यामुळे नागरिक हैराण असून, काम पूर्ण होईपर्यंत टोलमाफी द्या, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

या महामार्गावरील सुरू असलेली कामे आणि असुरक्षितता याबाबत १० जून २०२४ रोजी ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही या दुरवस्थेबद्दल फेसबुकवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने एकूणच या कामाबद्दल आणि नागरिकांच्या गैरसोयींबद्दल वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले पाच दिवस कागलपासून सातारा आणि त्यापुढच्या कामाचा पंचनामा ‘लोकमत’च्या प्रतिनिधी आणि छायाचित्रकारांच्या माध्यमातून करण्यात आला. या मालिकेला वाचकांनीही प्रतिसाद दिला.

सुरक्षित आणि जलद प्रवास व्हावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या बदल्यात वाहनधारकांकडून टोल संकलन केले जाते. ही पध्दत आता रूढ झाली आहे. परंतु, कोल्हापूर शहरावर लादण्यात आलेला टोल आंदोलनाच्या माध्यमातून रद्दही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर पुणे या महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलही रद्द करण्याची गरज आहे.

काम सुरू असताना अधिक धोका

या महामार्गावर काम सुरू असताना अनेक ठिकाणी धोकादायक डायव्हर्शन्स काढण्यात आली आहेत. मूळ महामार्ग आणि सेवा मार्गातही उंचसखलपणा आहे. रस्त्याकडील अनेक डबक्यांमध्ये पाणी साठून आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर सळ्या आणि कॉलम आले आहेत. आडवे आलेले गर्डर, उलट्या बाजूने येणारी धोकादायक वाहने अशा परिस्थितीत कसरत करत सध्या प्रवास सुरू असताना टोल कशासाठी घेता, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत.

वाहनधारकांच्या आणि प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आले. ‘कोण दळतंय आणि कोण पीठ खातंय’ हे प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांच्या या गैरसोयींची दखल घेत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल रद्द करावा. - मंदार वैद्य, कोल्हापूर
 

दोनच दिवसांपूर्वी पुण्याला जाऊन आलो. साडे सहा तास लागले. चार ठिकाणी खड्ड्यांमुळे ट्रक पलटी झालेले दिसले. म्हणूनच जोपर्यंत सहापदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीने टोल वसुली बंद करावी, अशी आमची मागणी आहे. - दिलीप देसाई, अध्यक्ष, प्रजासत्ताक संस्था, कोल्हापूर

कोल्हापूर-पुणे टोल नाके

  • एकूण टोलनाके - ४
  • किणी - ९० रुपये
  • तासवडे - ७५ रुपये
  • खेड शिवापूर - ११५ रुपये
  • आणेवाडी - ८० रुपये
  • एकूण - ३६० रुपये

Web Title: Toll waiver is required till completion of six-lane construction of Kagal Pune National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.