परजिल्ह्यांतील वाहनांवर टोल लावावा
By admin | Published: December 27, 2015 01:24 AM2015-12-27T01:24:53+5:302015-12-27T01:27:05+5:30
चंद्रकांतदादांचा सल्ला : रस्तेदुरुस्तीची कसरत होणार; टोल रद्दची उद्या अधिसूचना
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या लोकभावना लक्षात घेऊन ‘आयआरबी’चा टोल रद्द केला आहे; पण महा-नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पैसे उभे करताना महापालिकेची कसरत होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावण्याचा विचार करावा, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. याशिवाय ‘आयआरबी’ला द्याव्या लागणाऱ्या रकमेपैकी कोणताही बोजा सरकार कोल्हापूर महानगरपालिकेवर टाकणार नसल्याचा महत्त्वाचा खुलासाही चंद्रकांतदादांनी यावेळी केला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरचा टोल रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळात आपले वजन सिद्ध केले आहे. टोल रद्दचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रथमच शनिवारी कोल्हापुरात आले. कोल्हापुरातील अनेक संस्थांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले.
टोल रद्द केल्याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जनभावनेचा आदर करीत कोल्हापूरचा टोल रद्द केल्याबाबत मला समाधान वाटते. या टोल रद्दची विधानसभेत घोषणा झाली असली तरी निर्णयाबाबत येत्या उद्या, सोमवारी नगरविकास खात्यामार्फत अधिसूचना काढण्यात येणार आहे. टोल रद्द केल्यानंतर बैठकीत तामसेकर मूल्यांकन समितीचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीला ४५९ कोटी रुपये देणार आहे; पण याचा कोणताही आर्थिक बोजा सरकार कोल्हापूर महापालिकेवर टाकणार नाही; पण महापालिकेने टेंबलाई टेकडी येथील आयआरबी कंपनीला दिलेली जागा राज्य रस्ते विकास महामंडळ आपल्या ताब्यात घेणार आहे. त्या जागेचा व त्यावरील बांधकामांवर मालकी हक्क हा रस्ते विकास महामंडळाचा राहणार आहे.
टोल रद्द करण्यात आला असला तरीही महापालिकेला तयार रस्ते आपल्या ताब्यात मिळालेले आहेत. टोल रद्दचा निर्णय झाल्याने नियमानुसार आता याच तयार रस्त्यांचा दुरुस्ती-देखभालीचा खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा दुरुस्ती व देखभालीचा खर्च तिला परवडणारा नाही.
या रस्त्यांवर वसुलीच्या केबिन्स तयार आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने स्थानिक वाहनांव्यतिरिक्त परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर नाममात्र कर लावावा. त्यासाठी शासनही सहकार्य करील असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)