टोलनाके हटविले

By admin | Published: February 7, 2016 12:53 AM2016-02-07T00:53:20+5:302016-02-07T00:53:20+5:30

आयआरबीचे अस्तित्व पुसले : रस्ते विकास महामंडळाच्या आदेशानंतर मनपाची कारवाई

Tolnake deleted | टोलनाके हटविले

टोलनाके हटविले

Next

कोल्हापूर : तमाम कोल्हापूरकरांच्या रोषाचे प्रमुख कारण बनून राहिलेल्या शहरातील नऊ टोलनाक्यांवरील ‘आयआरबी’च्या केबिन्स शनिवारी सायंकाळनंतर हटविण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने ही कारवाई केली. आयआरबीने नाक्यावर उभ्या केलेल्या कमानी या महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने त्या उतरविण्यात येणार नाहीत, असे मनपा सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने टोल रद्द केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ कोल्हापुरात आज, रविवारी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ‘आयआरबी’ने उभ्या केलेल्या टोलनाक्यांवरील केबिन्स हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्वत: आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली आणि केबिन्स काढून टाकण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारी आयुक्तांनी महापालिकेत सर्वच विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्या त्यांच्या हद्दीतील टोलनाक्यावरील केबिन्स काढून घेण्याच्या सूचना दिल्या.
‘दादां’नी शब्द खरा केला..
कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार करणार हा भाजप सरकारचा शब्द आहे व त्याबाबत कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेकदा केली होती. दोन दिवसांपूर्वी टोल रद्दची अधिसूचना जाहीर झाली तेव्हाही त्यांनी दोन दिवसांत टोलनाकेही काढून टाकले जातील, असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाके हलविल्याने आयआरबी कंपनीच्या व ‘टोल’अस्तित्वाच्या खुणाही कायमच्या पुसल्या गेल्या.
 

Web Title: Tolnake deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.