निवडणुकीमुळे टोलमाफीचे गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2015 11:56 PM2015-09-12T23:56:18+5:302015-09-12T23:56:18+5:30
जयंत पाटील यांची पालकमंत्र्यांवर टीका : मुश्रीफ फौंडेशनच्या गणराया अवॉर्डचे वितरण
कोल्हापूर : राज्याचे टोलमाफीचे धोरण ठरविताना कोल्हापूरचा विचार केला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील घाईगडबडीने टोलमुक्तीची घोषणा करतील; पण त्याची अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची तरतूद नाही, हे कोल्हापूरकरांनी ध्यानात ठेवावे, अशी टीका राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली.
हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने शनिवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित गणराया अवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. जयंत पाटील म्हणाले, तरुण मंडळांनी येथून पाठीमागे सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला; पण महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या सात-आठ महिन्यांत सामाजिक शांतता भंग पावली आहे. पुरोगामी विचारांचा पराभव करण्यासाठी विचारवंतांच्या हत्या करण्याचे धाडस काही प्रवृत्तींनी सुरू केले आहे. तरुण मंडळांनी या प्रवृत्तीवर देखाव्यांच्या माध्यमातून भाष्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार मुश्रीफ म्हणाले, तरुण मंडळांनी देखाव्यांमध्ये सामाजिक विषय निवडताना पानसरे, दाभोलकर हत्या व त्यांचे खुनी का सापडले नाहीत, यावर समाजप्रबोधन करावे. माजी महापौर आर. के. पोवार यांनी स्वागत केले. फौंडेशनचे अध्यक्ष सुनील महाडेश्वर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, प्रा. जयंत पाटील, आदिल फरास, उत्तम कोराणे, मुरलीधर जाधव, रमेश पोवार, अजित राऊत, अजिंक्य चव्हाण, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदी उपस्थित होते. यावेळी सजीव देखावा, तांत्रिक देखावा, उत्कृष्ट सजावट, शिस्तबद्ध मिरवणूक, उत्कृष्ट मूर्ती, आदी गटांत साठपेक्षा अधिक मंडळांना दहा हजार ते एक लाखापर्यंत बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तावडेंचे प्रमाणपत्र सापडेना
गेल्या सात महिन्यांत सरकारमध्ये काय चालले आहे, हेच सामान्य माणसाला कळेना. शिक्षणमंत्र्यांची डिग्री बोगस निघाली; पण आता त्यांचे दहावी व बारावी परीक्षांचे प्रमाणपत्र शोधले असता तेही संबंधित मंडळाला सापडत नाही, अशी टीका करीत आम्ही चुका केल्या म्हणून विरोधी पक्षात बसलो; पण भविष्यात सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केवळ राष्ट्रवादीच करू शकते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
धनंजय महाडिक-मुश्रीफ दरी वाढली..
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित दोन कार्यक्रम होते; परंतु या दोघांनी सोयीने त्यातील एका कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने दुपारी शाहू स्मारक भवनात झालेल्या गणराया अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खासदार महाडिक यांना निमंत्रितच करण्यात आले नव्हते. त्यामुळे महाडिक तिकडे फिरकले नाहीत. तत्पूर्वी सकाळी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अधिवेशन बागल चौकातील लक्ष्मी मल्टिपर्पज हॉलमध्ये झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुश्रीफ होते. प्रमुख पाहुणे खासदार महाडिक होते. या अधिवेशनास महाडिक उपस्थित राहिले; परंतु मुश्रीफ तिकडे फिरकले नाहीत.
बापटांनी रेकॉर्ड मोडले
मंत्री गिरीश बापट यांनी परवा आपल्या विचारसरणीचे प्रदर्शन केले. आतापर्यंत एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कोणीही मंत्री बोलला नाही, इतके ते घसरले. त्यांनी तर रेकॉर्डच मोडल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
पुरस्कार विजेती मंडळे
सजीव देखावा - प्रथम : छत्रपती शिवाजीराजे-कसबा बावडा. द्वितीय : मित्रप्रेम, ताराबाई रोड. तृतीय : उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर. उत्तेजनार्थ : मनोरंजन, कसबा बावडा, शिवाजी, कसबा बावडा.
तांत्रिक देखावा - प्रथम : विजेता, कसबा बावडा. द्वितीय : नंदी, रंकाळा. तृतीय : जय शिवराय, उद्यमनगर. उत्तेजनार्थ : शाहूपुरी युवक, राजर्षी शाहू चौक, जवाहरनगर, शिवसाई, लक्ष्मीपुरी.
उत्कृष्ट सजावट - प्रथम : राधाकृष्ण, शाहूपुरी. द्वितीय : रंकाळावेश, गोल सर्कल. तृतीय : दिलबहार, मंगळवार पेठ. उत्तेजनार्थ : राजारामपुरी शिवाजी, राजारामपुरी व सोल्जर, तोरस्कार चौक.
शिस्तबद्ध मिरवणूक - प्रथम : लेटेस्ट, मंगळवार पेठ. द्वितीय : तुकाराम माळी, साठमारी. तृतीय : छत्रपती संभाजीनगर. उत्तेजनार्थ : शिपुगडे तालीम, जुना बुधवार व सम्राट, कसबा बावडा.
उत्कृष्ट मूर्ती- गिरणी कॉर्नर, हत्यार गु्रप, साई तरुण, शाहू तरुण, ओमकार फ्रेंड्स सर्कल, ओम मित्र, साईनाथ गु्रप, मृत्युंंजय, रणझुंजार, अष्टविनायक, न्यू सम्राट चौक, क्रांती ग्रुप, ऋणमुक्तेश्वर, खालचा कट्टा ग्रुप, उद्योगराजा, मनोरंजन युवक, देशप्रेमी क्रीडा, भगवा फें्रड्स सर्कल, धार गु्रप, च्याव म्याव ग्रुप, जय विजय, शिवप्रेमी, जय शिवराय, राजे दरबार, श्री म्हसोबा, दत्तसम्राट, विश्वकर्मा, राधाकृष्ण भक्त, जय पद्मावती, कलकल ग्रुप, पी बॉईज, मंगळवार पेठ.