टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:54 IST2025-03-19T17:53:49+5:302025-03-19T17:54:01+5:30

रोहित तवंदकर दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. ...

Tomato crop is rotting in the field due to lack of value for the crop in kolhapur | टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

रोहित तवंदकर

दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. कोबी, ढबू, फ्लॉवर, टोमॅटो या प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत पाठविली जातात. सध्या टोमॅटो पिकाला भाव नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहून कुजत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.

दानोळी परिसरातील कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे गावांमधून टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोला दर मिळत नसल्याने काढणीचाही दर परवडेनासा झाला आहे. मालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. खर्चापेक्षा तीन ते चार पट फायदा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. या वर्षी सुरुवातीला टोमॅटोला शंभर रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले; परंतु पीक आल्यानंतर दर ढासळल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. 

परिणामी काढणीचाही खर्च निघत नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहिल्यामुळे ते कुजत आहे. दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा शेतातील उभ्या पिकावर शेतकऱ्याला नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे मालाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मोठ्या मेहनतीने शेतकरी शेतात फळभाज्या करत असतो; पण त्या मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देश वाचविण्यासाठी बळीराजा जगला पाहिजे यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - पोपट शिंदे, शेतकरी, दानोळी

Web Title: Tomato crop is rotting in the field due to lack of value for the crop in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.